Rahul Gandhi, PM Narendra Modi Sarkarnama
देश

Rahul Gandhi : नरेंद्र मोदींचा मेमरी लॉस! राहुल गांधींची टोलेबाजी, थेट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं उदाहरण दिलं...

Maharashtra Assembly Election Mahavika Aghadi Mahayuti : राहुल गांधी यांची आज अमरावती येथे प्रचारसभा झाली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार प्रहार केला.

Rajanand More

Amaravati Rally : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात संविधानावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. राहुल गांधींनी शनिवारी मोदींचा मेमरी लॉस झाल्याचा टोला लगावला. त्यासाठी त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे उदाहरण दिले. मी जे बोलतोय तेच मोदी बोलत असल्याची टीका राहुल यांनी सभेत केली.

अमरावती येथे शनिवारी झालेल्या प्रचारसभेत राहुल गांधी यांनी जोरदार टोलेबाजी केली. ते म्हणाले, राहुल गांधी आरक्षणविरोधी असल्याचे पंतप्रधान सांगतात. माझ्या बहिणीने सांगितले की, ‘जे आपण बोलतोय, तेच आजकाल मोदीजी बोलत आहेत.’ माहिती नाही, बहुतेक मेमरी लॉस झाला आहे. जसे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष होते, काय बोलायचे हे विसरून जायचे. त्यांचा मेमरी लॉस झाला होता.

अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांप्रमाणेच आपल्या पंतप्रधानांचाही मेमरी लॉस होत आहे, असा टोला राहुल यांनी लगावला. बहुतेक पुढच्या सभेत येऊन मोदीजी म्हणतील की, महाराष्ट्रातील सरकार सोयाबीनला प्रति क्विंटल सात हजार रुपये भाव देत आहे. मी म्हटले, भाजप संविधानावर आक्रमण करत आहे. ते म्हणतात, काँग्रेस आक्रमण करत आहे. पुढच्या सभेत म्हणतील, राहुल गांधी जातनिहाय जनगणनेच्या विरोधात आहे, अशी फटकेबाजी राहुल यांनी केली.

महाराष्ट्रातील सरकारची चोरी

पंतप्रधान आणि भाजपचे लोक बंद खोलीत, लपून या संविधानाची हत्या करत आहेत. महाराष्ट्रातील जनतेकडून त्यांचे सरकार चोरले. त्या बैठकीत अदानी, अमित शाह होते. सरकार चोरी करण्याची ती बैठक होती. या बैठकीत आमदारांना विकत घेतले जाईल, असे ठरले होते. तुमचे सरकार चोरले तेव्हा ते संविधानाचे रक्षण करत होते का?, असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला. (Mahavikas Aghadi)

मोदी, शाह, भाजपचे लोक धारावीची जमीन एक लाख कोटींची जमीन आपले मित्र गौतम अदानींना द्यायची होती. म्हणून सरकारची चोरी करण्यात आली. धारावीच्या जमिनीचा सौदा झाला होता. त्यासाठी आमदारांना कोट्यवधी रुपये देण्यात आले होते, असा घणाघात राहुल यांनी केला.

आम्ही म्हणतो, हा देश संविधानाद्वारे चालायला हवा. पंतप्रधान मोदी म्हणतात, हे पुस्तक रिकामे आहे त्यात काही नाही. हे पुस्तक फक्त आरएसएस आणि भाजपच्या लोकांसाटी रिकामे आहे. आमच्यासाठी हे या देशाचा डीएनए आहे. यामध्ये आंबेडकर, फुले, शिवाजी महाराज, भगवान बुध्द, महात्मा गांधी या सगळ्यांचे विचार आहेत. हा हजारो वर्षांपूर्वीचा विचार असल्याचे राहुल यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT