Rahul Gandhi Congress Meeting Sarkarnama
देश

Rahul Gandhi : राहुल गांधी, ताकही फुंकून पिणार! दिल्लीतील बैठकीत महाराष्ट्रातील नेत्यांना 3 महत्वाच्या सूचना

Rajanand More

New Delhi : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता मंगळवारी लागू शकते. यापार्श्वभूमीवर सोमवारी दिल्लीत काँग्रेस नेत्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला राज्यातील नेत्यांना महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला. अनपेक्षित पराभवामुळे पक्षश्रेष्ठींकडून आता महाराष्ट्राबाबत दक्षता घेतली जात आहे. जागावाटप, मुख्यमंत्रिपदाची चर्चा असो की मराठा-ओबीसी वाद प्रत्येक बाबतीत ताकही फुंकून पिण्याची भूमिका पक्षाने घेतल्याचे समजते. प्रामुख्याने राज्य पातळीवर कोणताही वाद निर्माण होऊ नये, असे निर्देश नेत्यांना देण्यात आले आहे.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांच्यासह राज्यातील अन्य काही नेते बैठकीला उपस्थित होते. महाराष्ट्रात हरियाणासारखी पक्षाची स्थिती होऊ नये, याबाबतही बैठकीत चर्चा झाली. पक्षांतर्गत गटबाजी आणि आघाडीतील बिघाडी टाळण्यासाठी सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या गेल्या आहेत.

मुख्यमंत्रिपदाचा चेहरा

राज्यात सध्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून महाविकास आघाडीत सातत्याने वादाची ठिणगी पडत आहे. मोठा भाऊ-छोटा भाऊ यावरून नेत्यांकडून विधाने केली जात आहेत. प्रामुख्याने शिवसेना आणि काँग्रेस नेते एकमेकांवर वार-पलटावर करत आहे. पक्षश्रेष्ठींनी या वादात न पडण्याची सूचना केली आहे. तसेच पक्षासह आघाडीतही गटबाजी न करण्याबाबतची ताकीदही नेत्यांना देण्यात आली आहे.

जागावाटप

महाविकास आघाडीमध्ये सध्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. मात्र काही जागांबाबत तीव्र वादही आहेत. त्यामुळे या जागांबाबत राज्य पातळीवर वादविवाद न करता त्यावर दिल्लीत केंद्रीय नेतृत्वाकडून घेतला जाईल, असेही स्पष्ट कऱण्यात आल्याचे समजते. स्थानिक पातळीवर वाद होऊ नये, यादृष्टीने ही सूचना करण्यात आली आहे.

मराठा-ओबीसी वाद

मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राज्यात वाद पेटलेला आहे. मराठा आणि ओबीसी वादाचा फटका बसण्याची शक्यता असल्याने काँग्रेस नेतृत्व अलर्ट मोडवर आहे. 'मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजात समन्वय राहील याची काळजी घ्या,' अशी महत्वाची सूचनाही पक्षश्रेष्ठींनी केल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT