प्रजासत्ताक दिन 2026 च्या निमित्ताने नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर झालेल्या भव्य संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने सर्वोत्तम कामगिरी करत पहिला क्रमांक मिळवला. यंदा महाराष्ट्राने ‘गणेशोत्सव’ ही सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध संकल्पना मांडली होती. या चित्ररथाने परंपरा, संस्कृती आणि आधुनिक भारताचा संदेश अतिशय प्रभावीपणे सादर केला. या स्पर्धेत जम्मू-काश्मीर राज्याचा चित्ररथ दुसऱ्या, तर केरळचा चित्ररथ तिसऱ्या क्रमांकावर राहिला. केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने अधिकृतपणे ही घोषणा केली.
महाराष्ट्राच्या चित्ररथातून गणेशोत्सवाचं भव्य आणि अर्थपूर्ण दर्शन घडवण्यात आलं. या चित्ररथाची संकल्पना आणि रचना तुषार प्रधान, रोशन इंगोले, कृष्णा सालवटकर आणि श्रीपाद भोंगाडे यांनी साकारली होती. विविध निकषांवर झालेल्या मूल्यांकनानंतर महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक देण्यात आला. सादरीकरणातील नावीन्य, सामाजिक संदेश, सांस्कृतिक मांडणी आणि दृश्यात्मक आकर्षण या सर्व बाबींमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ उजवा ठरला.
यंदाच्या चित्ररथाची मांडणी ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेवर आधारित होती. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून तो लाखो लोकांच्या उपजीविकेचा आधार कसा बनला आहे, हे या चित्ररथातून दाखवण्यात आलं. अष्टविनायकांच्या प्रतिकृती, ढोल-ताशांचा गजर आणि गणपती बाप्पाची भव्य मूर्ती यामुळे चित्ररथ अधिक उठावदार झाला. गणेशोत्सवामुळे मूर्तीकार, सजावटकार, कलाकार, वादक, लघुउद्योग आणि स्थानिक व्यावसायिकांना रोजगार मिळतो, हा आत्मनिर्भरतेचा संदेश ठळकपणे मांडण्यात आला.
महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होते. या उत्सवाच्या माध्यमातून हजारो कुटुंबांना रोजगार मिळतो आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते. हाच मुद्दा चित्ररथातून प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आला. लोकमान्य टिळकांनी समाज एकत्र यावा, राष्ट्रीय एकात्मता वाढावी यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. आज तो उत्सव सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्राची ओळख बनला आहे.
यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये देशभरातून एकूण 30 चित्ररथ सहभागी झाले होते. यामध्ये 17 राज्ये आणि 13 केंद्र सरकारच्या विभागांचे चित्ररथ होते. स्वातंत्र्याचा मंत्र ‘वंदे मातरम्’ आणि समृद्धीचा मंत्र ‘आत्मनिर्भर भारत’ ही यंदाच्या परेडची मुख्य थीम होती. विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांच्या समितीने केलेल्या निवडीत महाराष्ट्राचा चित्ररथ सर्वोत्कृष्ट ठरला आणि राज्याच्या सांस्कृतिक वैभवाचा डंका पुन्हा एकदा देशभरात वाजला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.