Karnataka Assembly Election Sarkarnama
देश

Karnataka Assembly Election : तोंडसुख घेणारे कानडी नेते आता महाराष्ट्रातील नेत्यांना पायघड्या घालणार!

शिवसेना आणि राष्ट्रवादीसह महाराष्ट्रातील काही नेते बेळगावात येऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांचा प्रचार करतात.

सरकारनामा ब्यूरो

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात मराठा समाज आणि मराठी भाषिक बहुसंख्येने आहेत. त्यामुळे कर्नाटक (Karnataka) विधानसभेच्या आगामी निवडणुकीत महाराष्ट्रातील नेत्यांचा दबदबा वाढणार आहे. इतर वेळी महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगाव आणि कर्नाटकात प्रवेश बंदी करणारे सरकार आता महाराष्ट्रातील नेत्यांना पायघड्या घालून त्यांचे स्वागत करण्यास सज्ज होणार आहेत. (Maharashtra's leaders of Importance will increase due to the Karnataka assembly elections)

प्रत्येक वेळी विधानसभा निवडणुकीत बेळगाव जिल्ह्यातील प्रमुख मतदारसंघांमध्ये महाराष्ट्रातील नेत्यांना बोलावून प्रचार केला जातो. बेळगाव ग्रामीण, दक्षिण, उत्तर, यमकनमर्डीसह अनेक मतदारसंघात महाराष्ट्रातील नेते येऊन भाजप आणि काँग्रेसचा प्रचार करतात. केवळ निवडणुकांवेळीच महाराष्ट्रातील नेत्यांची राष्ट्रीय पक्षांना गरज भासते. या मतदारसंघांमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निवडणूक लढवत असतात. त्यांच्या पराभवासाठी महाराष्ट्रातील नेतेदेखील पक्षाची जबाबदारी म्हणून येऊन आपापल्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करतात.

कर्नाटक सरकारने डिसेंबर महिन्यात झालेल्या कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनावेळी बेळगावात महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेश बंदी केली होती. विधिमंडळ अधिवेशनावेळी त्याला प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीकडून महामेळाव्याचे आयोजन केले जाते. त्यामुळे कर्नाटक सरकारने हिवाळी अधिवेशनाच्या काळात आणि महाराष्ट्रातील नेते सीमा प्रश्नातील हुतात्म्यांच्या भेटीवेळी येत असताना बंदी घातली होती.

नुकतेच राजहंसगडावर झालेल्या काँग्रेसच्या शिवपुतळा लोकार्पण सोहळ्यात महाराष्ट्रातील नेत्यांना पायघड्या घालण्यात आल्या होत्या. आता आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रचारास सुरुवात होणार असून मराठी भाषिक मतदारांना गळ घालण्यासाठी भाजप आणि काँग्रेसकडून महाराष्ट्रातील नेत्यांना बोलावले जाणार आहे.

महाराष्ट्र एकीकरण समिती सीमा भागातील मराठी भाषिकांच्या न्याय हक्कासाठी लढते. शिवसेना आणि राष्ट्रवादीसह महाराष्ट्रातील काही नेते बेळगावात येऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांचा प्रचार करतात. भाजप आणि काँग्रेस सारख्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठीही महाराष्ट्रातील नेतेमंडळी येत असल्याने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचारावर त्याचा प्रभाव जाणवतो.

कर्नाटकातील नेते वेळोवेळी महाराष्ट्रातील नेत्यांवर तोंडसुख घेत असतात. मात्र, ऐन गरजेच्या वेळेला अशा नेत्यांना महाराष्ट्रातील नेते हवेच असतात. त्यामुळे महाराष्ट्रातील नेत्यांनी कर्नाटकात प्रचाराला येण्यापूर्वी आधी या सर्व बाबींकडे एकदा पाहणे गरजेचे आहे, अशी भावना सीमावर्ती भागातील मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीकडून बोलून दाखवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT