BJP Sarkarnama
देश

BJP MLA : भाजप आमदाराच्या वडिलांनी सरकारी जमीन हडपली? ग्रामस्थ आक्रमक; आरोप होताच थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

BJP MLA Maithili Thakur : बिहारमध्ये जमीन अतिक्रमणावरून वाद उफाळला असून भाजप आमदाराच्या वडिलांविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. तर सरकारी जमीन आणि रस्त्यावर अतिक्रमण करत ती हडपल्याचा आरोप केला जात आहे.

Aslam Shanedivan

Bihar Political Crime News : बिहारमधील भाजप आमदार मैथिली ठाकूर यांचे वडील रमेश ठाकूर यांच्यावर सरकारी जमीन, सार्वजनिक रस्ते आणि खासगी जमिनीवर अतिक्रमण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. दरभंगा जिल्ह्यातील पोखरभिंडा पंचायतीमध्ये हा वाद निर्माण झाला असून, गावकऱ्यांनी या प्रकरणी थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार दाखल केली आहे. संबंधित अतिक्रमणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

या प्रकरणामुळे स्थानिक पातळीवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावकऱ्यांनी विभागीय अधिकाऱ्यांकडे सामूहिक अर्ज सादर केला असून, मुख्यमंत्री कार्यालयालाही पत्र पाठवले आहे. याशिवाय सहयोग पोर्टलवरही त्यांनी आपली तक्रार नोंदवली आहे.

ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार, भाजप आमदार मैथिली ठाकूर यांचे वडील रमेश ठाकूर यांच्याकडून गावातील ग्रामदैवत तिवारी बाबा स्थानाजवळ असलेल्या सामुदायिक श्रद्धास्थळाच्या जमिनीवर अतिक्रमण करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच शशीनाथ मिश्रा चौक ते वॉटरवेजपर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या काही भागावरही अनधिकृत ताबा मिळवण्यात आल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. हा रस्ता मुख्य मार्गाला जोडणारा असून, शेतांपर्यंत पोहोचण्यासाठी ग्रामस्थ त्याचा वापर करतात. मात्र, रस्त्याच्या बांधकामामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होत असून, शेतीची कामे आणि दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होत असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.

खासगी जमिनीच्या अतिक्रमणाबाबतही काही ग्रामस्थांनी गंभीर आरोप केले आहेत. एका गावकऱ्याच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मालकीच्या जमिनीवर जबरदस्तीने ताबा मिळवून सीमाभिंत उभारण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना स्वतःच्या बागेत जाण्याचा मार्गही बंद झाला आहे. आणखी एका ग्रामस्थाने आपल्या जमिनीवर अतिक्रमण झाल्याचा आरोप केला आहे. जमिनीच्या मोबदल्यात पर्यायी जमीन देण्याचे ठरले होते; मात्र प्रत्यक्षात जमिनीची अदलाबदल झाली नाही आणि ठरलेली रक्कमही मिळाली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

तलावातून वाहणारा नाला बुजवून त्याठिकाणी भूरक्षकाचे घर बांधण्यात आल्याचा आरोपही गावकऱ्यांनी केला आहे. उर्वरित जागेवर रस्ता तयार करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याशिवाय तिवारी बाबा स्थान आणि सामुदायिक श्रद्धास्थळाच्या जमिनीच्या प्रश्नावरून ग्रामस्थांवर दबाव आणला जात असल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या सर्व प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून सरकारी, सार्वजनिक आणि खासगी जमिनींची मोजणी करावी, तसेच अतिक्रमण आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. आता या तक्रारीवर मुख्यमंत्री कार्यालय आणि स्थानिक प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT