Manipur Violence | Meitei Attack | Imphal Protest Sarkarnama
देश

Manipur Violence : मणिपूर पुन्हा पेटलं! तिघांची गोळ्या घालून हत्या; संतप्त नागरिकांनी मृतदेह थेट मुख्यमंत्र्यांच्या दारात ठेवले

Manipur ethnic violence : सोमवारी सकाळी सुमारे ९.४० वाजता कांगपोकपी जिल्ह्यातील सुनुरोक डोंगररांगांमध्ये हा हल्ला झाला. मैतेई समाजातील १४ जण सकाळी लाकूड गोळा करण्यासाठी गावाजवळील डोंगरात गेले होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला.

Jagdish Patil

Manipur Violence : मणिपूरमध्ये जातीय हिंसाचाराची परिस्थिती पुन्हा चिघळली आहे. कांगपोकपी जिल्ह्यातील डोंगराळ भागात लाकूड गोळा करण्यासाठी गेलेल्या मैतेई समाजातील नागरिकांवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. यात तीन जणांचा मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी तिन्ही मृतदेह राजधानी इंफाळमध्ये आणून मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर आंदोलन केले.

नेमकी घटना काय?

सोमवारी सकाळी सुमारे ९.४० वाजता कांगपोकपी जिल्ह्यातील सुनुरोक डोंगररांगांमध्ये हा हल्ला झाला. मैतेई समाजातील १४ जण सकाळी लाकूड गोळा करण्यासाठी गावाजवळील डोंगरात गेले होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला.

या हल्ल्यात अरुबम रोनिल (३५) आणि लैरेनलाकपम इनाओबी (५१) यांचा जागीच मृत्यू झाला. तर क्षेत्रीमयुम सुशील (३२) याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. एन. सूरज (१९), मैसनम सोमेंद्रो (५३) आणि के. बोसन (४५) हे तिघे जखमी झाले आहेत.

मुख्यमंत्री निवासाबाहेर मृतदेह ठेवून आंदोलन

हल्ल्याची माहिती समजताच संतप्त नागरिकांनी मृतदेह इंफाळमधील मुख्यमंत्री वाय. खेमचंद सिंह यांच्या बाबूपारा येथील निवासस्थानाबाहेर आणून ठेवले. आंदोलकांना हटवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर मृतदेह जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथे हलवण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ इंफाळमधील खुराई लामलोंग परिसरात रास्ता रोको करण्यात आला. ईमा कीथेल बाजारात महिलांनीही आंदोलन केले. शहरातील अनेक बाजारपेठा आणि दुकाने बंद ठेवण्यात आली.

मुख्यमंत्र्यांकडून सुरक्षा आढावा

मुख्यमंत्री वाय. खेमचंद सिंह यांनी नागरिकांच्या हत्येचा निषेध करत संवेदनशील भागांतील सुरक्षा वाढवण्याचे निर्देश दिले. यासंदर्भात गृहमंत्री, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि लष्करासह विविध सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस, सीआरपीएफ, कोब्रा, आसाम रायफल्स आणि बीएसएफने संयुक्त मोहीम सुरू केली आहे. तर संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ठिकठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत.

मणिपूरमध्ये तीन वर्षांपासून जातीय संघर्ष

मणिपूरमध्ये मे २०२३ पासून मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये संघर्ष सुरू आहे. खोऱ्यात मैतेई, तर डोंगराळ भागात कुकी समुदायाची लोकसंख्या अधिक आहे. या संघर्षात आतापर्यंत किमान ३०६ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेकजण अद्याप बेपत्ता आहेत. याशिवाय यंदा फेब्रुवारीपासून कुकी आणि नागा समुदायांमध्ये झालेल्या संघर्षातही सुमारे ५० जणांचा मृत्यू झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT