Satej Patil Factor : ‘गोकुळ’च्या निकालातून बंटी पाटलांनी वाढविले भाजपचे टेन्शन; पण पक्षहित वरचढ ठरणार की नात्यागोत्याचे राजकारण?

Pune Graduate and Teachers Constituency Elections : सतेज पाटील यांच्या गोकुळ निवडणुकीतील विजयामुळे पश्चिम महाराष्ट्रातील भाजपविरोधकांचा आत्मविश्वास वाढला आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या मतदानापूर्वी विरोधकांचे मनोबल खच्ची करणे भाजपसमोर आव्हान असून नातेसंबंध की पक्षनिष्ठा निर्णायक ठरणार, याकडे लक्ष आहे.
Satej Patil
Satej PatilSarkarnama
Published on: 
Updated on: 

Solapur, 19 October : अवघ्या चारच दिवसांवर विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाचे मतदान आले आहे. या मतदानापूर्वी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकीत काँग्रेस आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखालील ‘राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी’ने जोरदार मुसंडी मारली आहे. ‘गोकुळ’च्या निकालातून पश्‍चिम महाराष्ट्रातील भाजपविरोधकांना मोठा आत्मविश्‍वास मिळाला आहे. पण, नात्यागोत्याचे राजकारण की पक्षनिष्ठा वरचढ ठरणार, याकडे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. पण, पक्षीय दृष्टीकोनातून पहिल्यास शिक्षक, पदवीधरच्या मतदानापूर्वी (शुक्रवार, ता. २३) त्यांच्या या आत्मविश्‍वासाला तोडण्याचे मोठे आव्हान भाजप नेत्यांसमोर आहे.

‘गोकुळ’च्या निकालाचा परिणाम पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. पुणे शिक्षकची जागा काँग्रेसकडून आमदार जयंत आसगावकर व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून हर्षदा जाधव-देशमुख लढत आहेत.

काँग्रेसचे आसगावकर हे कोल्हापूरचे आहेत, तर भाजपने या निवडणुकीत शिक्षकसाठी मैदानात उतरविलेले कौस्तुभ गावडे व पदवीधरसाठी मैदानात उतरविलेल्या डॉ. स्मिता जाधव हे दोघेही कोल्हापूर जिल्ह्यातीलच आहेत. त्यामुळे ‘गोकुळ’च्या निकालाचा थेट परिणाम तीन उमेदवारांवर कोल्हापूर जिल्ह्यात होण्याची शक्यता आहे. शेजारच्या सांगली, सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यांतही भाजपविरोधी नेत्यांना या निकालाने आत्मविश्‍वास मिळण्याची शक्यता आहे.

आसगावकर व जाधव यांच्या प्रचारासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांचा ज्या प्रमाणे एकोपा दिसतो, त्या प्रमाणे महायुती म्हणून एकोपा दिसत नाही. शिक्षक मतदारसंघात शिवसेनेने अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पुरस्कृत करून शेवटच्या टप्प्यात भाजपविरोधात भूमिका घेतली आहे. शिक्षकसाठी विरोध करणारे शिवसैनिक पदवीधरसाठी कोणाचे काम करत आहेत, याचाही शोध घेण्याची गरज आहे.

Satej Patil
Satej Patil Appeal : सतेज पाटलांची ‘ती’ भावनिक साद ठरली निवडणुकीचा टर्निंग पॉईंट : 2 मंत्री, 2 खासदार अन्‌ 10 आमदारांना दिला धोबीपछाड

राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचे नेते व कार्यकर्ते या निवडणुकीत सध्या तरी शांत दिसत आहेत. कामापेक्षा जास्त ॲक्टिव्ह झालेली शिवसेना आणि अजूनही सायलेंट असलेली राष्ट्रवादीची भूमिका भाजपसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

नात्याचे चक्रव्यूह कसे भेदणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ, शिवसेनेचे मंत्री प्रकाश आबिटकर, भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्यासह जिल्ह्यातील महायुतीच्या आमदारांनी ‘गोकुळ’च्या निवडणुकीतून आखलेला चक्रव्यूह काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी यशस्वीपणे भेदला आहे. आमदार सतेज पाटील यांची भाची असलेल्या डॉ. स्मिता जाधव यांना उमेदवारी देऊन भाजपने विधान परिषदेच्या पदवीधर निवडणुकीत पाटील यांच्याभोवती नात्याचे चक्रव्यूह आखले आहे.

दुसरे चक्रव्यूह आमदार पाटील कसे भेदणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेवटच्या टप्प्यात त्यांनी नात्याला प्राधान्य दिल्यास ‘रयत’ची ताकद काँग्रेसच्या आसगावकरांऐवजी रासपच्या दत्तात्रय सावंतांच्या पाठीशी उभी राहण्याची शक्यता आहे.

Satej Patil
Uday Samant : शिवसेना नेत्याचा जयकुमार गोरेंना इशारा : ‘एवढं हिणवू नका; अन्यथा गोकुळ होतं, हे लक्षात ठेवा’

भाजपची नवी-जुनी यंत्रणा अलर्ट

पुणे शिक्षकची जागा भाजप पहिल्यांदाच लढत आहे. पदवीधर आणि शिक्षकची लढत भाजपने प्रतिष्ठेची केली आहे. त्यासाठी भाजपने नव्या आणि जुन्या नेत्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना शिस्तीत कामाला लावले आहे. संघटनात्मक ताकद आणि जिंकण्यासाठी लागणारे सर्व काही देण्याची असलेली तयारी ही भाजपची जमेची बाजू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या निवडणुकीत लक्ष घातले आहे. मुख्यमंत्री फडणवीस निवडणुकीतील कामगिरी पक्की लक्षात ठेवत असल्याने भाजपची नवी-जुनी यंत्रणा अलर्ट झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com