Manipur News : मणिपूरमध्ये मागील 18 महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. यावरून काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी राज्य व सत्ताधारी भाजपवर सातत्याने टीका केली जात आहे. काँग्रेसने याबाबत राष्ट्रपतींनाही पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. आता या मुद्द्यावरून भाजपमध्ये फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
मणिपूर सरकारमधील कॅबिनेट मंत्री युमनाम खेमचंद सिंह उघडपणे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यात मुख्यमंत्री अपयशी ठरल्याने त्यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी भूमिका सिंह यांनी घेतली आहे. याबाबत त्यांनी न्यूज 18 वृत्तवाहिनीशी बोलताना यावर भाष्य केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी हिंसाचारावर चर्चा करण्यासाठी सोमवारी सर्व आमदारांची बैठक बोलावली होती. मात्र युमनाम सिंह या बैठकीला गैरहजर होते. त्यावरून त्यांची नाराजी अधोरेखित झाली होती. राज्यात 18 महिन्यांपासून शांतता नाही. मी त्यांना राजीनामा देण्याबाबत सांगितले होते. पण त्यांनी त्याचा विचार केला नाही. आतापर्यंत ते शांतता परत आणू शकले नाहीत, मग ते राजीनामा का देत नाहीत?, असा सवाल सिंह यांनी केला आहे.
लोक खूप भावनिक असून त्यांना परिस्थितीची जाणीव करून देण्याची गरज आहे. आंदोलक माझ्या घरी आले तेव्हा मीही न्यायाची प्रतिक्षा करत असल्याचे त्यांना सांगितले. मीही भावनिकदृष्ट्या कोलमडून गेलो आहे. मी त्यांना विनंती केली आणि लोकांनी ते समजून घेतले, असा दावा सिंह यांनी केला आहे. राज्यात खूप सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. पण लोकांशी बोलून प्रत्यक्ष काय परिस्थिती आहे, हे समजून घ्यायला हवे, असेही सिंह यांनी सांगितले.
दरम्यान, मणिपूर मुद्यावरून काँग्रेसने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी राज्यातील स्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. या पत्रानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना पत्र लिहून टीका केली आहे. दोन्ही पक्षांमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोप होत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.