Maharashtra Election Result Exit Polls: चावडीवरच्या गप्पांचा असह्य गोंगाट! नागरिकांना हवी एकदाची सुटका…

Political uproar after exit polls favor Mahayuti in Maharashtra: एक्झिट पोल समोर आल्यानंतर एकच राजकीय गोंगाट सुरू झाला आहे. बहुतांश एक्झिट पोलचे निष्कर्ष महायुतीकडे झुकणारे आहेत. महाविकास आघाडीला मात्र हे मान्य नाही. त्यासाठी गेल्या काही निवडणुकांत चुकलेल्या एक्झिट पोलचा हवाला दिला जात आहे, जो खरा आहे. यातून निर्माण झालेल्या गोंगाटातून सुटकेची प्रतीक्षा नागरिकांना लागली आहे.
Mahayuti, Mahavikas Aghadi
Mahayuti, Mahavikas AghadiSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election 2024: राज्यात गेल्या पाच वर्षांत ऐतिहासिक म्हणाव्यात अशा राजकीय घडामोडी घडल्या. दोन प्रादेशिक पक्ष फुटले. अनेक मातब्बर नेत्यांनी पक्षांतर केले. पाच पर्षांत तीन मुख्यमंत्री लाभले. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीला असाधारण महत्व प्राप्त झाले आहे.

महाराष्ट्राची राजकीय वाटचाल कशी राहील, हे या निवडणुकीच्या निकालावरून ठरणार आहे. एक्झिट पोलनी या निकालाची उत्सुकता आणखी वाढवून ठेवली आहे. राजकीय पक्षांच्या दावे-प्रतिदाव्यांना चावडीवरच्या गप्पांचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

गेल्या काही निवडणुकांचे बहुतांश एक्झिट पोल चुकीचे ठरलेले आहेत. या पार्श्वभूमीवर एक्झिट पोलवरून राजकीय पक्षांमध्ये जुंपली आहे, राजकरण सुरू झाले आहे. विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळणार, असा निष्कर्ष बहुतांश एक्झिट पोलनी काढला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना मात्र हे मान्य नाही. जमिनीवर परिस्थिती वेगळी होती, त्यामुळे आम्हालाच बहुमत मिळणार, असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे. 20 तारखेला मतदान झाले आणि 23 तारखेला मतमोजणी होणार आहे. तरीही दावे-प्रतिदाव्यांनी धुमाकूळ घातला आहे.

Mahayuti, Mahavikas Aghadi
Sharad Pawar : 'वस्ताद'च ते ! वय 84; 64 दिवसांत 43 कार्यक्रम, 13 पत्रकार परिषदा अन् राज्यात 60 जाहीर सभा..!

लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला चारशे, चारशेपेक्षा अधिक जागा मिळतील, असा दावा बहुतांश एक्झिट पोलनी केला होता. हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसची सत्ता येईल, असा दावा जवळपास सर्वच एक्झिट पोलमधून करण्यात आला होता, मात्र तो सपशेल खोटा ठरला. हरियाणात सत्ता भाजपची आली. गेल्या काही निवडणुकांपासून एक्झिट पोलचे अंदाज सातत्याने चुकत आहेत. त्यामुळे राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलवरून महायुती आणि महाविकास आघाडीत दावे-प्रतिदावे सुरु झाले आहेत.

सत्तास्थापनेत अपक्षांना महत्व येणार असल्याचे निष्कर्षही काही एक्झिट पोलनी काढले आहेत. त्यामुळे विजयी होऊ शकणाऱ्या अपक्षांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न निकाल लागण्यापूर्वीच महायुतीने सुरू केला आहे. एक्झिट पोलवर आमचा विश्वास नाही, सरकार महाविकास आघाडीच स्थापन करणार, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. वाढलेल्या मतदानाचा टक्का हा लाडक्या बहिणींचा आहे. त्याचा फायदा आम्हालाच होणार, असे महायुतीच्या नेत्यांकडून सांगितले जाऊ लागले आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह टिकून राहत आहेत.

Mahayuti, Mahavikas Aghadi
Sharad Pawar : शरद पवारांनी सरकार स्थापनेचा आकडा सांगितला; 'मविआ'चा 'कॉन्फिडन्स' वाढला

कार्यकर्त्यांचा उत्साह टिकून राहत असला तरी सातत्याने कानावर धडकणारे राजकीय पक्षांचे दावे-प्रतिदावे सर्वसामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू लागले आहेत. गेली पाच वर्षे राज्यातील नागरिक अनपेक्षित, थक्क करून राजकीय घडामोडींचे साक्षीदार ठरले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांची, नेत्यांची विश्वासार्हता पणाला लागली आहे. अमुक उमेदवार निवडून आला तरी तो पाच वर्षे त्या पक्षासोबत राहिल किंवा नाही, अशी शंका व्यक्त केली जाऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या गोटामध्ये सरकार स्थापन करण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

गेल्या पाच वर्षांत दोन पक्ष फुटले. त्यापूर्वी शिवसेना-भाजपची युती तुटली. उद्धव ठाकरे हे विरोधी विचारसरणीच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेले. महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर महायुतीचे सरकार स्थापन झाले. वर्षभरानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून अजितदादा पवार यांनी विरोधी विचारसरणीच्या भाजप आणि शिवसेनेसोबत घरोबा केला. सर्वकाही सत्तेसाठी चालले आहे, असा संदेश त्यामुळे समाजात गेला. आता एक्झिट पोलची चर्चा सुरू झालेली असताना सत्तेसाठी पुन्हा एकदा अनपेक्षित, धक्कादायक राजकीय समीकरणे जुळतात का, असे नागरिकांना वाटू लागले आहे.

शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र येणार, अशी चर्चा अगदी काही दिवसांपूर्वीच सुरू झाली आहे. त्यावर, एकनाथ शिंदे हे योग्य दिशेनेच जातात, त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत राहणार, असे विधान शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केले आहे. त्यामुळे धक्कादायक राजकीय घडामोडी घडणार, याचे संकेत मिळू लागले आहेत. ही अशी चर्चा आणि मिळणारे संकेत एक्झिट पोलचे फलित म्हणावे लागेल. याशिवाय, महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून मोठी रस्सीखेच होणार आहे. महाविकास आघाडीतही तशीच परिस्थिती आहे. एक्झिट पोल खरे ठरतील की कसे, हे 23 नोव्हेंबरला दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. मात्र त्यामुळे राजकीय पक्ष कामाला लागले असून, या गोंगाटातून सुटका कधी होईल, याची प्रतीक्षा नागरिकांना लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com