मुंबई : सातत्याने राजकीय विरोधकांना टार्गेट करत असल्याचा आरोप होत असलेल्या ईडी (ED) अर्थात अंमलबजावणी संचालनालयाच्या रडारवर आता जेष्ठ पर्यावरणवादी नेत्या मेधा पाटकर (Medha Patkar) या आल्या आहेत. त्यांच्या नर्मदा नवनिर्माण अभियान या एनजीओच्या खात्यावर काही संशयित व्यवहार झाल्याच्या आरोपात त्यांच्याविरोधात संजीव कुमार झा यांनी तक्रार दाखल केली आहे. २००५ सालातील म्हणजे तब्बल १७ वर्षांपूर्वीचे हे प्रकरण आहे. ईडीशिवाय महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) आणि आयकर विभागातही (Income Tax) पाटकर यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
नर्मदा नवनिर्माण अभियान या एनजीओच्या बँक ऑफ इंडियाच्या 001010100064503 या अकाऊंटवर १८ जून २००५ या एका दिवशी १ कोटी, १९ लाख, २५ हजार ८८० रुपयांच्या देणग्या मिळाल्या. पण ही सर्व रक्कम २० वेगवेगळ्या खात्यांवरुन ५ लाख ९६ हजार २९४ रुपयांच्या एक समान रक्कमेच्या व्यवहारांच्या स्वरुपात जमा झाली होती. शिवाय ही रक्कम जमा करणाऱ्या एक देणगीदारांपैकी पल्लवी प्रभाकर भालेकर या त्यावेळी अल्पवयीन होत्या, असा आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. सोबतच लॉकडाऊन काळात माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडकडून मिळालेल्या देणग्यांचाही तपास करण्यात यावा अशी मागणी या तक्रारीमध्ये करण्यात आली आहे.
मात्र या तक्रारीबाबत प्रतिक्रिया देताना मेधा पाटकर यांनी या अफवा असल्याचे सांगितले आहे. त्या म्हणाल्या, सोशल मिडीया आणि वृत्तपत्रांमधील या बातम्या वाचून मला धक्का बसला. हे जे काही छापून ते भाजपचे गाझियाबादचे जिल्हा सरचिटणीस यांच्या तक्रारीच्या आधारे छापून आले आहे. त्यांनीच माझ्या पासपोर्टची देखील तक्रार केली होती. त्याबाबतची चौकशी देखील झाली आहे. पासपोर्ट जमा केला आहे. त्यांच्याकडून अद्याप अंतिम अहवाल आलेली नाही.
मेधा पाटकर पुढे म्हणाल्या, बँकेचे अकाऊंट्स आणि ऑडिट्स पूर्ण क्लिअर आहेत. जे २० व्यवहार संशयास्पद असल्याची तक्रार केली आहे, ते व्यवहार आम्हाला बँकेतून प्राप्त झालेल्या बँक स्टेटमेंटमध्ये कुठेही आढळत नाहीत. त्यामुळे हे आरोप पूर्णपणे खोटे आहेत. तसेच माझगांव डॉककडून मिळालेल्या देणगीतून आम्ही मागील दोन वर्षांपासून जीवनशाळामधील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी जेवणाची व्यवस्था केली. त्याबाबतच्या हिशोबाचा अहवाल माझगांव डॉकला सादर केला आहे. याशिवाय या देणग्या नंदूरबार जिल्हाधिकाऱ्यांच्या शिफारशीवरुन स्विकारण्यात आल्या असल्याचेही पाटकर यांनी स्पष्ट केले. याबाबतची सर्व कागदपत्र तपासयंत्रणांना देण्यात आल्या असून ते समाधानी आहेत, असेही त्या म्हणाल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.