मुंबई : सातत्याने राजकीय विरोधकांना टार्गेट करत असल्याचा आरोप होत असलेल्या ईडी (ED) अर्थात अंमलबजावणी संचालनालयाच्या रडारवर आता जेष्ठ पर्यावरणवादी नेत्या मेधा पाटकर (Medha Patkar) या आल्या आहेत. त्यांच्या नर्मदा नवनिर्माण अभियान या एनजीओच्या खात्यावर काही संशयित व्यवहार झाल्याच्या आरोपात त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. २००५ सालातील म्हणजे तब्बल १७ वर्षांपूर्वीचे हे प्रकरण आहे. ईडीशिवाय महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) आणि आयकर विभागातही (Income Tax) पाटकर यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, नर्मदा नवनिर्माण अभियान हे बृन्हमुंबई चॅरिटी कमिश्नर यांच्याकडे नोंदणी असलेले एनजीओ आहे. यात मेधा पाटकर या मुख्य विश्वस्त आहेत. याच एनजीओच्या बँक ऑफ इंडियाच्या 001010100064503 या अकाऊंटवर १८ जून २००५ या एका दिवशी १ कोटी, १९ लाख, २५ हजार ८८० रुपयांच्या देणग्या मिळाल्या. पण यात एक महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे, ही सर्व रक्कम २० वेगवेगळ्या खात्यांवरुन ५ लाख ९६ हजार २९४ रुपयांच्या एक समान रक्कमेच्या व्यवहारांच्या स्वरुपात जमा झाली होती. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, ही रक्कम जमा करणाऱ्या एक देणगीदारांपैकी पल्लवी प्रभाकर भालेकर या त्यावेळी अल्पवयीन होत्या.
याशिवाय पाटकर यांच्या या एनजीओला संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (पूर्वीचे माझगांव डॉक लिमिटेड) कडून जानेवारी २०२० ते मार्च २०२१ या लॉकडाऊन काळात वेगवेगळ्या व्यवहारांमध्ये ६ टप्प्यांमध्ये ६२ लाखांच्या देणग्या मिळाल्या आहेत. त्यामुळे आता या सरकारी संस्थेच्या खात्यावरुन पाटकर यांच्या खात्यावर नेमके कशा आणि कोणी देणग्या दिल्या याची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणातील आणखी एक लक्षणीय गोष्ट म्हणजे, मेधा पाटकर यांच्या विरोधात तक्रारदार व्यक्तीचे नाव संजीव कुमार झा असे आहे. यापूर्वी झा यांच्याच तक्रारीवरुन मुंबईच्या पासपोर्ट अधिकाऱ्यांनी महत्वपूर्ण गोष्टी लपवल्याच्या आरोपावरुन पाटकर यांचा पासपोर्ट जप्त केला होता. तक्रारदार झा यांनी या प्रकरणात संघटनात्मक गुन्हेगारीचा आरोप केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.