Mi-17V-5 Sarkarnama
देश

MI-17 : पाच वर्ष, सहा अपघात आणि २८ जणांचा मृत्यू

सरकारनामा ब्युरो

कुन्नूर (तमिळनाडू) : चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांचे हेलिकॉप्टर अपघतात निधन झाले आहे. आज दुपारी १२ वाजून ४० मिनीटांनी तमिळनाडूतील कुन्नूरजवळ त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला होता. या अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधूलिका यांच्यासह एकूण १४ जण प्रवास करत होते. या १४ जणांपैकी रावत यांच्यासह एकूण १३ जणांचा मृत्यू झाला असून ग्रुप कॅप्टन वरुण सिंग (Warun Singh) बचावले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

या गंभीर घटनेनंतर बिपीन रावत आणि अन्य उच्चाधिकारी ज्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते त्या MI-17V5 या हेलिकॉप्टरची चर्चा सुरु झाली आहे. वायूदलातील हे हेलिकॉप्टर रशियन निर्मित असून अत्यंत सुरक्षित आणि सर्वश्रेष्ठ समजले जाते. हे Mi-8/17 या हेलिकॉप्टरच्या फॅमिलीचा भाग आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने आणि शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असे हे हेलिकॉप्टर समजले जाते. त्यामुळे सैन्यातील बड्या अधिकाऱ्यांच्या वाहतुकीसाठी याचा वापर केला जातो. तसेच शोध मोहिमे, गस्त घालणे, मदत आणि बचाव कार्य या कामांसाठीही या हेलिकॉप्टरचा वापर केला जातो.

मात्र MI-17 आणि त्या फॅंमिलीमधील हेलिकॉप्टर जेवढे अत्याधुनिक समजले जाताता, तेवढेच कदाचित धोकादायक देखील. कारण मागच्या पाच वर्षात MI-17 हेलिकॉप्टर्सचे आजच्यासहित ६ अपघात झाले असून यात तब्बल २८ जणांना आपला जीव गमवावा लागला होता.

१) तवांग (अरुणाचल प्रदेश)

६ मे २०१७ रोजी अरुणाल प्रदेशमधील तवांग जवळ हवाई दलाच्या MI-17 हे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले होते. या अपघातात ५ जवान शहीद झाले होते, तर इतर २ जणांचा मृत्यू झाला होता. हवाई दलाच्या माहितीनुसार, या हेलिकॉप्टरने सकाळी ६ वाजता उड्डाण केले होते. त्यानंतर काही वेळातच ते दुर्घटनाग्रस्त झाले होते.

२) केदारनाथ (उत्तराखंड)

३ एप्रिल २०१८ रोजी उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये MI-17 हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले होते. गुप्तकाशीवरुन बांधाकामाचे साहित्य घेऊन येणारे हे हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरण्यापूर्वी ६० मीटर अंतरावरच दुर्घटनाग्रस्त झाले होते. या हेलिकॉप्टरमधून ६ जण प्रवास करत होते. यापैकी १ जण किरकोळ जखम झाला होता, तर इतर सर्वजण सुरक्षित बचावले होते.

३) बडगाम (जम्मू-काश्मीर)

२७ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी १० वाजता जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात MI-17 हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. या दुर्घटनेत हवाई दलातील ६ अधिकाऱ्यांसह एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. दरम्यान, हा अपघात निष्काळजीपणामुळे घडला असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले होते. यावेळी काही अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती.

४) केदारनाथ (उत्तराखंड)

२०१८ नंतर २०१९ मध्येही केदारनाथमध्येच MI-17 हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. २३ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी उड्डाण करताना हेलिकॉप्टर कोसळले होते. सुदैवाने अपघातात हेलिकॉप्टरच्या पायलटसह ६ जण बचावले होते. या हेलिकॉप्टरने केदारनाथहून गुप्तकाशीला जाण्यासाठी उड्डाण केले होते.

५) अरुणाचल प्रदेश -

१८ नोव्हेंबर २०२१ रोजी MI-17V5 हे हेलिकॉप्टर अरुणाचल प्रदेशामध्ये लँडिंग दरम्यान कोसळले होते. सुदैवाने यामधून प्रवास करणारे ५ क्रू मेंबर्स बचावले होते, त्यांना केवळ किरकोळ जखमा झाल्या होत्या. एअर मेन्टेनन्स चार्जिंग सुरु असताना हा अपघात घडला होता. या अपघाताच्या तपासासाठीही कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT