Goa Assembly Sarkarnama
देश

Goa Assembly News : गोव्यात आमदाराच्या नातेवाईकाचा खून अन् थेट विधानसभेत लक्षवेधी; जाणून घ्या, प्रकरण काय?

सरकारनामा ब्यूरो

Goa Assembly Monsoon Session 2024: गोव्यातील शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो यांचे नातेवाईक, ओसीआय कार्डधारक अरनॉल्ड सुवारिस (वय- 69) यांचा कांदोळी भागात रविवारी धारदार हत्याराने भोसकून खून झाला. कांदोळीतील या प्रकरणावरुन आणि राज्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडल्याचे समोर आले आहे.

लक्षवेधीवर बोलताना दिलायला लोबो यांनी मृत अरनॉल्ड सुवारिस हे त्यांचे नातेवाईक असल्याचे सांगितले. मृत सुवारिस हे त्यांच्या चुलत्याच्या पत्नीचा भाऊ असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात घडणाऱ्या अशाप्रकारच्या घटनांवर त्यांनी चिंता व्यक्त केली.

ओर्डा-कांदोळी येथे घरात एकटाच राहणाऱ्या अरनॉल्ड सुवारिस यांची हत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर, याबाबत मायकल लोबो यांनी लक्षवेधी मांडून या घटनेसह आसगाव घर मोडतोड प्रकरणाचा उल्लेखही केला. याचबरोबर राज्यातील वाढत्या गुन्हेगारी घटनांबाबत योग्य कार्यवाही करण्याची मागणी केली.

लोबोंच्या या लक्षवेधीवर आमदार विजय सरदेसाई, कार्लुस फेरेरा, विरेश बोरकर, वेंझी व्हिएगस, निलेश काब्राल, रुडॉल्फ फर्नांडिस, उल्हास तुयेकर, चंद्रकांत शेट्ये, जेनेफर मोन्सेरात, आंतोनियो वाझ आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मत मांडत सूचना केल्या.

आमदारांनी सूचना करताना राज्यात सीसीटीव्ही कॅमेरे, भाडेकरु पडताळणी, रात्रीची पोलिस गस्त आणि सार्वजनिक ठिकांच्या सीसीटीव्हीचा एक्सेस थेट पोलिस ठाण्यात देण्यात यावा अशी मागणी केली.

यावर उत्तर देताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यात भाडेकरुंची पोलिस पडताळणी बंधनकारक असल्याचे नमूद केले. घरमालकांनी देखील याची काळजी घेण्याचे आवाहन केले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT