Asaduddin Owaisi Criticized Maharashtra Government : सध्या राज्यातील राजकीय वातावरण हे विशाळगड अतिक्रमण प्रकरणावरून तापताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी काही हिंदुत्व संघटनांनी आंदोलन केले. या दरम्यान तेथील एका मशिदीची आंदोलकांनी तोडफोड केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
या घटनेचा कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी निषेध नोंदवला आणि प्रशासनाला खडेबोल सुनावले. तर दुसरीकडे एमआयएमनेही या घटनेमुळे आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे.
या घटनेच्या निषेधार्थ एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासादार इम्तियाज जलील(Imtiaz Jalil) यांनी कोल्हापूरमध्ये मोर्चा काढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यासाठी एमआयएमच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांना संदेश देण्यात आला आहे. तर याशिवाय एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत, राज्य सरकारवर टीका केली आहे.
मीडियाला प्रतिक्रिया देताना ओवैसी(Asaduddin Owaisi) म्हणाले, 'हा मशिदीवर झालेला एकप्रकारचा दहशतवादी हल्ला आहे आणि ६ डिसेंबरची वारंवार पुनरावृत्ती होत आहे. तिथे एकनाथ शिंदे- फडणवीसांचं भाजपचं सरकार आहे. या सरकारमुळेच अशाप्रकारचे हल्ले मशिदींवर होत आहेत. मशिदीत घुसून कुरान शरीफचा अवमान केला गेला. मशिदीचं अपवित्रिकरण केलं गेलं, जाळपोल केली गेली. तिथे मुस्लिमांची घरं होती, त्या घरांमध्ये घुसून त्यांचे दागिने आणि पैसे लुटले गेले आणि पोलीस केवळ तमाशा बघत राहिली.'
याशिवाय 'एकप्रकारे एकनाथ शिंदे(Eknath Shinde) - भाजपच्या सरकारकडून यासाठी प्रोत्साहनच दिलं जात आहे. त्यामुळेच अशा लोकांची हिंमत वाढत आहे. एकीकडे आपण विश्वगुरू बनू इच्छित आहोत आणि दुसरीकडे मशिदींवर चढून ती पाडण्याचा प्रयत्न होतोय. जगातली तिसरी मोठी अर्थव्यस्था बनायला जात आहोत आणि मशिदीत घुसून कुरान जाळत आहोत. मग कोणते विश्वगुरु आणि कसलं काय?'
तसेच 'जाणीवपूर्वक मुस्लिमांना आणि त्यांच्या धार्मिकस्थळांना लक्ष्य केलं जातय, हेच यावरून सिद्ध होत आहे. गुन्हे दाखल केले मात्र तुम्ही किती जणांना अटक केली? मागील आठ महिन्यांमधील महाराष्ट्रातील घडामोडी तुम्ही बघा, या ठिकाणी नेहमीच मशिदींना लक्ष्य केलं जात आहे आणि येथील सरकार काहीच करत नाही. केवळ गप्प राहून तमाशा बघत बसले.' असा आरोपही ओवैसींनी केला.
याचबरोबर 'त्यामुळेच मी काल हे म्हणालो आहे की, आता आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या मुस्लिमांनी एमआयएम पक्षाच्या उमेदवाराला विजयी करावं, जेणेकरून कुणीतरी याविरोधात आवाज उठवेल. ते जे पक्ष म्हणत होते नैतिक विजय, नैतिक विजय आता तर या हल्ल्याबाबत त्यांच्या तोंडून आवाजही निघत नाही.' असंही यावेळी ओवैसींनी बोलून दाखवलं.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.