Nitish Kumar, Rahul Gandhi, Chandrababu Naidu Sarkarnama
देश

Chandrababu Naidu-Nitish Kumar : मोदींसोबत राहून दोन्ही ‘बाबू’ राबवणार काँग्रेसचा अजेंडा?

Rajanand More

New Delhi : एनडीएला बहुमत मिळाल्याने नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. आंध्र प्रदेशचे भावी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पाठिंब्यावर या सरकारचे भवितव्य अवलंबून असेल. त्यामुळे या दोन ‘बाबूं’च्या भूमिकांशी जुळवून घेत मोदींना सरकारचा गाडा हाकावा लागणार आहे.

नितीश कुमार आणि नायडूंच्या काही भूमिका काँग्रेसच्या मतांशी जुळणाऱ् आहेत. मात्र, भाजपच्या धोरणांमध्ये बसणाऱ्या नाहीत. प्रचारातही त्याचे प्रतिबिंब उमटले. मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याआधीही त्याची चुणूक दिसून आली. त्यामुळे काही बाबतीत हे दोन्ही बाबू सरकारमध्ये राहून काँग्रेसचाच अजेंडा राबवणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

जातनिहाय जनगणना

नितीश कुमार यांचा जातनिहाय जनगणनेला पाठिंबा आहे. एनडीएमध्ये दाखल होण्यापुर्वीच त्यांनी बिहारमध्ये अशी जनगणना केली आहे. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात या मुद्यावर जोर दिला होता. भाजपने मात्र त्यावर सडकून टीका केली. पंतप्रधान मोदींसह शाहांकडून काँग्रेसवर सातत्याने हल्ला चढवला जात होता. जातनिहाय जनगणना म्हणजे देशात फुट पाडण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. पण आता नितीश कुमार यांचा पक्षाही देशात सत्तेत असल्याने जातनिहाय जनगणनेसाठी त्यांच्याकडून दबाव टाकला जाऊ शकतो.

अग्निवीर योजना

अग्निवीर योजनेला काँगेसने सुरूवातीपासूनच विरोध केला आहे. सत्तेत आल्यास ही योजनाच रद्द करण्याची घोषणा काँग्रेसने केली होती. बिहार आणि उत्तर प्रदेशात एनडीएला दणका बसल्यानंतर एनडीएतील अनेक नेत्यांनी अग्निवीरकडे बोट दाखवले. तर नितीश कुमार यांच्या पक्षाने सत्तास्थापनेआधीच या योजनेचा नव्याने विचार करण्याची गरज असल्याची भूमिका मांडली आहे.

मुस्लिमांना आरक्षण

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटकात मुस्लिमांना ओबीसीतून देण्यात आलेल्या आरक्षणावरून काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. संविधानामध्ये धर्मावर आधारित आरक्षणाची तरतूद नाही, असे ते वारंवार सांगत होते. पण आंध्र प्रदेशात मुस्लिमांना चार टक्के आरक्षणासाठी चंद्राबाबूंची भूमिका सकारात्मक आहे. त्यामुळे इथेही मोदींनी एका पाऊल मागे घेण्याची वेळ येणार आहे.

समान नागरी कायदा

समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्यास काँग्रेसचा सुरूवातीपासून विरोध आहे. नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांचीही भूमिका फारशी वेगळी नाही. त्यामुळे मोदी सरकारला हा कायदा लागू करताना शंभरवेळा विचार करावा लागणार असल्याचे दिसते. दोन्ही नेत्यांच्या सहमतीशिवाय हा कायदा रेटून नेता येणार नाही.

चारही मुद्दे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात गाजले होते. त्याबाबतीत जी मतं काँग्रेसची आहेत, तीच मतं नितीश कुमार आणि चंद्राबाबूंचीही आहेत. त्यामुळे या दोन नेत्यांच्या रुपाने काँग्रेसला आपले दूत मिळाल्याचे दिसते. त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काँग्रेसकडून चारही मुद्यांवर संसदेत दबाव आणला जाऊ शकतो, हे निश्चित.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT