Why Jagdeep Dhankhar Was Targeted : उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर जगदीप धनखड आणि केंद सरकारमधील मतभेदावरून अनेक तर्क लढवले जाऊ लागले आहेत. धनखड यांनी राजीनामा का दिला, याबाबत चर्चांना उधाण आले आहेत. त्यातच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मोदी सरकारने धनखड यांच्याविरोधातच अविश्वास प्रस्तावाची तयारी केली होती, असे वृत्त आहे.
जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यापूर्वी बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. त्यांना मोदी सरकारमधील बड्या केंद्रीय मंत्र्यांनी फोन करून राजीनामा द्या, अन्यथा तुमच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला जाईल, असे धनखड यांना सांगितले होते. त्यानंतर दोन तासांनी धनखड यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे.
‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी भाजप आणि उपराष्ट्रपतींदरम्यानची दरी मोठ्या प्रमाणात वाढली. सोमवारी धनखड यांना भेटण्यासाठी एक मंत्री त्यांच्या कार्यालयात गेले होते. त्यावेळी ते सचिवांसोबत होते. त्यांच्यासमोर धनखड यांनी मंत्र्यांना सुनावले होते. बिझनेस अडव्हाजरी कौन्सिलच्या बैठकीतही सरकारमधील मंत्री आणि धनखड यांच्यात वाद झाला होता.
बैठकीत जे. पी. नड्डा, किरेन रिजिजू, अर्जून राम मेघवाल, एल मुरूगन हे मंत्री होते. यावेळी धनखड म्हणाले होते की, ‘ऑपरेशन सिंदूरवर पंतप्रधान, गृहमंत्री आणि संरक्षण मंत्र्यांनी उपस्थित राहावे, पंतप्रधानांनी उत्तर द्यावे.’ यावर रिजिजू यांनी कोण उत्तर देणार हा सरकारचा निर्णय असल्याचे सांगितले. धनखड यांना हे उत्तर पटले नाही. तुम्ही पंतप्रधानांना विचारून या, असे धनखड यांनी त्यांना सूचित केले.
या घटनाक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत एस. जयशंकर, अमित शाह, राजनाथ सिंह, नड्डा, निर्मला सीतारमण, मनोहर लाल खट्टर, शिवराज सिंह चौहान, रिजिजू आदी मंत्र्यांची बैठक होते. धनखड यांची पुन्हा समजूत काढण्याचे या बैठकीत ठरते. मात्र, दुपारी ४.३० वाजण्याच्या बीएसीच्या बैठकीआधीच धनखड हे ६३ विरोधी पक्षांच्या सदस्यांची सही असलेल्या न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या महाभियोगाच्या प्रस्तावावर कार्यवाही सुरू करतात. हाच मुद्दा सरकार आणि धनखड यांच्यातील दरी अधिक वाढण्यास कारणीभूत ठरतो.
याबाबत पंतप्रधान मोदींना माहिती दिली जाते. त्यानंतर नड्डा आणि रिजिजू धनखड यांची भेट घेत महाभियोगाच्या प्रस्तावावर पुनर्विचार करण्याची विनंती केली. पण धनखड त्यांचे म्हणणे मान्य करत नाहीत. त्यानंतर काही वेळाने पुन्हा रिजिजू आणि मेघवाल त्यांच्याकडे जातात. न्यायाधीश वर्मा यांच्यावर संयुक्तपणे लोकसभेत प्रस्ताव आणला जाणार असल्याची माहिती धनखड यांना दिली जाते. पण त्यानंतर ते माघार घेत नाहीत. रिजिजू आणि मेघवाल रिकाम्या हाताने परततात.
सरकार आणि धनखड यांच्यामधील मतभेद आता टोकाचे बनले होते. धनखड काही केल्या माघार घेण्यास तयार नव्हते. अखेर सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास मोदी सरकारमधील एका बड्या मंत्र्यांचा धनखड यांना फोन जातो. ‘तुम्ही राजीनामा द्या, अन्यथा तुमच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला जाईल. या प्रस्तावावर ९० खासदारांच्या सह्या झाल्या आहेत,’ असे मंत्र्यांकडून सांगितले जाते.
दरम्यानच्या काळात संसदेचे कामकाज संपल्यानंतर मंत्र्यांचे दहा गट तयार करण्यात आले. प्रत्येक मंत्र्यांच्या घरी प्रत्येकी दहा खासदार होते. धनखड यांनी मान्य केले नाही तर त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला जाईल, असे खासदारांना सांगितले जाते. मागील सहा महिन्यांपासून धनखड हे सरकारसोबत समन्वय साधत नसल्याचे कारण खासदारांना देण्यात आले. त्यानंतर धनखड यांना शेवटचा फोन जातो. या फोननंतर धनखड हे राष्ट्रपती भवनकडे रवाना झाले. तिथे त्यांना २० ते २५ मिनिटे राष्ट्रपतींची वाट पाहावी लागली. त्यानंतर रात्री ९ वाजून २५ मिनिटांनी धनखड सोशल मीडियात पोस्ट करून राजीनाम्याची माहिती देतात. त्यामध्ये ते आरोग्याचे कारण देतात, असे ‘आज तक’च्या वृत्तात म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.