Bihar Election : वादग्रस्त ‘SIR’चा अहवाल आयोगाकडून जाहीर; धक्कादायक आकडे समोर, राजकीय पक्ष हादरले...
ECI Bihar update : मागील महिनाभरापासून बिहारसह देशाचे राजकारण ढवळून काढलेल्या SIR चा म्हणजेच मतदार पुनर्पडताळणी मोहिमेचा अहवाल समोर आला आहे. भारतीय निवडणूक आयोगाकडून रविवारी हा अहवाल अधिकृतपणे जाहीर केला. या अहवालातील आकडे ड़ोळे पांढरे करणारे आहेत. मतदार यादीतील तब्बल 65 लाखांहून अधिक मतदारांचा ठावठिकाणाच सापडत नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये 24 जून 2005 अखेरीस 7 कोटी 89 लाख मतदार नोंदणीकृत होते. पुनर्पडताळणी मोहिमेअंतर्गत 7 कोटी 24 साथ मतदारांनी आपले ओळख पटवणारे फॉर्म भरले. या मोहिमेत 25 जुलैअखेरपर्यंत 91.69 टक्के मतदारांनी सहभाग घेतल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले आहे.
मोहिमेमध्ये तब्बल 22 लाख म्हणजे एकूण मतदारांपैकी 2.83 टक्के मतदारांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. तर 36 लाख मतदार त्यांनी यापूर्वी नोंदविलेल्या पत्यावर सापडले नाहीत किंवा ते कायमस्वरुपी स्थलांतरित झाले असावेत, असे दिसून आले. तर जवळपास 7 लाख मतदारांची एकापेक्षा अधिक मतदारसंघात नोंदणी असल्याचेही या मोहिमेत आढळून आले आहे.
याचा अर्थ तब्बल 65 लाख मतदारांचा ठावठिकाणा लागलेला नाही. ता. 24 जून ते 25 जुलै या महिनाभरात राबविण्यात आलेल्या मोहिमेअंतर्गत मतदारयादीत अशा त्रुटी आढळून आल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या मतदारांचा ठावठिकाणा लागलेला नाही ते इतर राज्यांमध्ये मतदार झाले असावेत, त्यांची बाहेर पडण्याची इच्छा असावी, वेळेत अर्ज दिला नसावा किंवा त्यांना पुन्हा मतदार म्हणून नोंदणी करायची असेल, असे खुलासा आयोकाने केला आहे.
दरम्यान, आयोगाकडून जाहीर केलेल्या आकड्यांची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे. मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून या मतदारांचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कोणताही मतदार या प्रक्रियेतून सुटू नये, यासाठी आयोगाकडून हे प्रयत्न केले जाणार आहेत. ता. 1 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत हरकती नोंदविता येणार आहेत.
दरम्यान, आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकड्यांमध्ये सर्वच राजकीय पक्षांना हादरा बसला आहे. याचा फटका निवडणुकीत कोणत्या पक्षाला सर्वाधिक बसणार, याबाबत आता तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. विरोधकांनी यापूर्वीच आयोगाच्या या मोहिमेवर आक्षेप घेतला आहे. त्याविरोधात सुप्रीम कोर्टातही धाव घेतली आहे. आता प्रत्यक्ष आकडे समोर आल्यानंतर 65 लाख मतदारांना मतदारयादीतून वगळले जाणार का, याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.