नवी दिल्ली : देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीमुळे नागरिक संकटात सापडले आहेत. अशातच मोदी सरकारने 1 डिसेंबरला हॉटेलवाल्यांना दणका दिला होता. व्यावसायिक वापरासाठीच्या स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या (LPG Cylinder) दरात 100 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. आता मोदी सरकारने आजपासून हा दर 102.50 रुपयांनी कमी हॉटेलवाल्यांना नवीन वर्षाची भेट दिली आहे.
व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरच्या 1 नोव्हेंबरला 266 रुपये वाढ करण्यात आली होती. नंतर पुन्हा दरात 1 डिसेंबरला 100 रुपये वाढ करण्यात आली होती. त्यामुळे 19 किलोचा एलपीजी सिलिंडरचा दर दिल्लीत 2 हजार 101 रुपयांवर पोचला होता. आता मोदी सरकारने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक वापराच्या सिलिंडरचा दर 102.50 रुपयांनी कमी केला आहे. यामुळे या सिलिंडरचा नवीन दर 1 हजार 998.50 रुपयांवर आला आहे.
पेट्रोलियम कंपन्यांनी 6 ऑक्टोबरला घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरचे दर 15 रुपयांनी वाढवले आहेत. त्यामुळे दिल्लीत एलपीजी सिलिंडरचा दर जवळपास 900 रुपयांवर पोचला आहे. एका सिलिंडरसाठी 899.50 रुपये मोजावे लागत आहेत. घरगुती वापराच्या 5 किलोच्या सिलिंडरसाठी 502 रुपये द्यावे लागत आहेत. मुंबईतही सिलिंडरचे हेच दर असतील. देशात 1 सप्टेंबरला गॅस सिलिंडरचे दर 25 रुपयांनी वाढले होते. तसेच 17 ऑगस्टला 25 रुपयांची दरवाढ करण्यात आली होती.
देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. पेट्रोलच्या दरासोबत डिझेलनेही शंभरचा टप्पा ओलांडण्यास सुरवात केली आहे. यातच आता एलपीजी सिलिंडर दरवाढीची भर पडली आहे. चालू वर्षभरात एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल 205 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे सामान्य नागरिकांना बसणाऱ्या महागाईच्या झळा आणखी वाढल्या आहेत.
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून मागील सात वर्षांत सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावून सरकारने आपली झोळी भरुन घेतली आहे. भाजप सरकारच्या काळात पेट्रोलवरील करात 220 टक्के आणि डिझेलवरील करात 600 टक्के वाढ झाली आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मे 2014 मध्ये भाजपचे सरकार आले. त्यावेळी केंद्र सरकारचा पेट्रोलवरील प्रतिलिटर कर 10.38 रुपये होता आणि आता तो 32.90 रुपये आहे. मे 2014 मध्ये केंद्र सरकारचा डिझेलवरील प्रतिलिटर कर 4.52 रुपये होता. तो आता 31.80 रुपये आहे. म्हणजे मागील सात वर्षांत पेट्रोलवरील करात 220 टक्के आणि डिझेलवरील करात 600 टक्के वाढ झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.