कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे (Sindhudurg District Bank Election) धक्कादायक निकाल लागले आहेत. या निवडणुकीसाठी भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे कणकवलीतील बंगल्यात मागील काही दिवस मुक्काम ठोकून होते. या निवडणुकीत राणेंच्या पॅनेलने वर्चस्व मिळवले असले तरी त्यांचा बालेकिल्ला असलेल्या कणकवलीत त्यांची अब्रू ईश्वरचिठ्ठीने राखली आहे. शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांचा चिठ्ठीवर पराभव झाला आहे. यावरून राणेंनी सावंतांवर निशाणा साधला आहे.
राणे म्हणाले की, सतीश सावंत यांना 36 मते मिळत नाहीत आणि ते विधानसभेच्या गोष्टी करीत आहेत. हात नसताना हातात सत्ता घेण्याची भाषा ते करतात. काल आमच्या एका महिला पदाधिकाऱ्याने त्यांचे तोंड बंद केले होते. त्यावेळी त्यांनी हड म्हटले होते. असे कोण बोलत असते का? त्यांनी निवडणुकीसाठी त्यांच्याकडील धनलक्ष्मी वाटली नाही तर बँकेचेचे पैसे वाटले. महाविकास आघाडी सरकारने कायद्याचा वापर करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला. यासाठी पोलिसांचाही वापर करण्यात आला.
या निवडणुकीत महाविकास आघाडी (MVA) आणि भाजप (BJP) दोघांमध्ये चुरस होती. शिवसेनेचे (Shivsena) सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर हल्ला झाल्यानंचरच नितेश राणे अडचणीत आले आहेत. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत (Satish Sawant) हे चिठ्ठीवर पराभूत झाले आहेत. कणकवली तालुक्यातून सावंत आणि भाजपचे विठ्ठल देसाई या दोघांनाही समान मते पडली. त्यामुळे शालेय विद्यार्थी देवेश नरेंद्र येडके याने चिठ्ठी काढली. या चिठ्ठीमध्ये भाजपचे विठ्ठल देसाई हे विजयी झाले. या निवडणुकीत आतापर्यंत महाविकास आघाडीला 5 आणि भाजपला 9 जागा मिळाल्या आहेत.
जिल्हा बँकेसाठी कणकवली तालुक्यात १६५ पैकी १६१ इतके मतदान झाले होते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा मतदार असलेले संदेश उर्फ गोठ्या सावंत यांची दोन मते, बेपत्ता असलेले विकास संस्थेचे मतदार प्रमोद वायंगणकर आणि आजारी असलेले सुरेश सावंत असे चार जण मतदार मतदानाचा हक्क बजावू शकलेले नाहीत. त्यामुळे जिल्हा बँकेबरोबरच कणकवली विकास संस्थेवर कोण बाजी मारणार याची प्रतीक्षा होती.
शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्यानंतर राजकीय वातावरण कमालीचे तापले होते. बँकेच्या निवडणुकीसाठी काल मतदान झाले. कणकवली हे संघर्षाचे केंद्र बनले होते. त्यामुळे कणकवलीत काय होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून होती. या मतदारसंघातील विकास संस्थेमधून विद्यमान बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत विरुद्ध संघाचे अध्यक्ष विठ्ठल देसाई अशी लढत होती. यासाठी एकूण ३६ मतदार होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.