Hema Malini in Parliament Sarkarnama
देश

हेमा मालिनी यांचा मोदी सरकारला संसदेतच घरचा आहेर; म्हणाल्या...

कोरोनामुळे लोक आणि शास्त्रीय कलाकारांची आर्थिक स्थिती बिकट झाल्याचे सांगत त्यांनी सांस्कृतिक मंत्रालयाबाबत नाराजी व्यक्त केली.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : भाजपच्या खासदार हेमा मालिनी (Hema Malini) यांनी बुधवारी मोदी सरकारला (Modi Government) संसदेतच घरचा आहेर दिला. कोरोनामुळे (Covid 19) लोक आणि शास्त्रीय कलाकारांची आर्थिक स्थिती बिकट झाल्याचे सांगत त्यांनी सांस्कृतिक मंत्रालयाबाबत नाराजी व्यक्त केली. कलाकारांना आपली कला सोडून उपजीविकेसाठी इतर कामे करावी लागत असल्याचा मुद्दा हेमा मालिनी यांनी उपस्थित केला.

हेमा मालिनी यांनी बुधवारी लोकसभेत कलाकारांची व्यथा मांडली. त्या म्हणाल्या, भारत आपली संस्कृती आणि सांस्कृतिक वारशामुळे जगभरात सर्वात चांगला आहे. आपली कला, संस्कृती आणि कलाकार त्याचे आधार आहेत. ज्या देशात कलाकारांची उपेक्षा होते, तिथे संस्कृतीचेही पतन झाले आहे. सध्या देशात कला क्षेत्र आणि कलाकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एक कलाकार म्हणून मी त्यांच्यासाठी चिंतित आहे.

आपले लोक आणि शास्त्रीय कलाकार तसेच अन्य कलाकारांची ओळख धोक्यात आली आहे. कोरोना महामारीमुळे त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यांना आपली कला सोडून उपजीविकेसाठी नाईलाजास्तव इतर कामे करावी लागत आहेत. या कलाकारांना आर्थिक सहाय्य आणि पेंशनची व्यवस्था करावी, अशी मागणी हेमा मालिनी यांनी केंद्र सरकारकडे केली.

हेमा मालिनी पुढे बोलताना म्हणाल्या, 2017 मध्ये सांस्कृतिक मंत्रालयाने कला आणि कलाकारांची माहिती एकत्रित करण्यासाठी सांस्कृतिक मानचित्रण योजना सुरू केली होती. हे एक राष्ट्रीय मिशन होते. पण उपलब्ध माहितीनुसार, ही योजना बंद करण्यात आली आहे. ही योजना पूर्ण करण्यासाठी सरकारने आवश्यक मदत करावी, अशी मागणीही हेमा मालिनी यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT