New Delhi : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान दोन तरुणांनी लोकसभेच्या सभागृहात घुसखोरी करीत गदारोळ केला होता. संसदेतील घुसखोरी करणाऱ्या तरुणांनी भाजप खासदार प्रताप सिम्हा यांच्या कार्यालयातून प्रवेशासाठी लागणारी सुरक्षा पास मिळवला होता. त्यावरून काँग्रेससह इतर काही संघटनांनी सिम्हा यांच्या विरोधात ‘देशद्रोही’ अशा आशयाचे पोस्टर झळकवत टीका केली होती. त्यावर आता खासदार प्रताप सिन्हा यांनी मौन सोडत प्रतिक्रिया दिली आहे.
कर्नाटकातील म्हैसूरुचे खासदार प्रताप सिन्हा म्हणाले की, ‘‘संसदेतील घुसखोरी प्रकरणात माझ्या नावाची बदनामी केली जात आहे. म्हैसुरुच्या डोंगरात वसलेली माता चामुंडेश्वरी आणि ब्रह्मगिरी डोंगरातून उगम पावणारी माता कावेरी ठरवेल की मी ‘देशद्रोही’ आहे की ‘देशभक्त’. याशिवाय म्हैसुरु आणि कोडगूची जनता याचा निर्णय घेईल. ज्या जनतेने माझे काम पाहिले आहे, ज्यांनी माझी देशभक्ती पाहिली आहे, देशाबद्दलची मते ऐकली आहेत, ते लोक 2024 मधील लोकसभा निवडणुकीत माझ्या बद्दलचे त्यांचे मत व्यक्त करतील.’’
‘गेल्या 20 वर्षांपासून माझ्या पुस्तकांतून माझे विचार वाचून प्रशंसा करणारे माझे वाचक मी देशद्रोही की देशभक्त आहे हे ठरवतील’ असेही खासदार सिम्हा यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. संसदेत घुसखोरी प्रकरण घटल्यातर कर्नाटकात भाजप खासदार प्रताप सिम्हा यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. त्यावर खासदार सिम्हा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेत संपूर्ण प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट केली.
संसदेत घुसखोरी करणारा सागर नामक आरोपीच्या वडिलांनी त्यांच्यांकडे पास मागितला होता. ते त्यांच्या मतदारसंघातील रहिवासी असल्याने आपण त्यांना पास उपलब्ध करून दिला, असेही स्पष्टीकरण सिम्हा यांनी लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांना दिले होते. पोलिसांना देखील चौकशीमध्ये जे उत्तर द्यायचे होते, ते उत्तर दिले असल्याची सिम्हा यांनी सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
13 डिसेंबर 2023 रोजी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे कामकाज सुरू होते. त्याचवेळी लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीमधून अचानक दोन तरुणांनी सभागृहात उडी मारली होती. त्यातील सागर नावाच्या तरुणाने आपल्या बुटात लपवून आणलेले ‘स्मोक कॅन्डल’ उडवले होते. त्यामुळे सभागृहात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणात संसदेच्या सुरक्षा यंत्रणेत त्रूटी आढळून आल्याने विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर थेट निलंबनाची कारवाई केली आहे. त्यावरून सध्या देशभरात सत्ताधारी व विरोधकांमध्ये घमासान सुरू आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.