Sanjay Raut | Devendra Fadnvis | Eknath Shinde Sarkarnama
देश

Sanjay Raut Slams Eknath Shinde : 'फेविकॉल का जोड' दोन महिन्यात तुटेल ; बेडकानं हत्तीशी तुलना करू नये ; राऊतांनी..

Sanjay Raut Slams Eknath Shinde : हे सरकार गेल्याशिवाय राहणार नाही

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : एका जाहिरातीतुळे शिवसेना-भाजपमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली. याचे जाहिरातनाट्य आपण पाहिले. शिवसेनेने पहिल्या दिवशी दिलेल्या जाहिरातीमुळे भाजपचे नेते नाराज झाले. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेनेला दुसऱ्यांदा जाहिरात देऊन सारवासारव करावी लागली.

‘देशात मोदी, राज्यात शिंदे’ या जाहिरातीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बिनसल्याबाबतच्या चर्चेला शिंदे यांनी गुरुवारी ‘ये फेविकॉल का जोड है, टुटेगा नही’ असे सांगत पूर्णविराम दिला.

फडणवीस यांच्याशी आपले मजबूत बंध (बॉण्डिंग) असून कोणी कितीही प्रयत्न केला तरी ते तुटणार नाहीत, असे शिंदे म्हणाले, तर एका जाहिरातीने किंवा कोणाच्या वक्तव्यामुळे या सरकारचे काही बिघडणार नाही, असे सांगत फडणवीस यांनी त्यांच्या सुरात सूर मिसळला.

‘ये फेविकॉल का जोड है, टुटेगा नही’ असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्री शिंदेंना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊतांनी टोमणा हाणला. राऊत शुक्रवारी माध्यमांशी बोलत होते.

राऊत म्हणाले, "देवेंद्र फडणवीस यांचे प्रवक्ते खासदार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बेडकाची उपमा दिली. बेडकानं हत्तीशी तुलना करू नये. मग हा फेव्हिकॉलचा जोड समजायचा का? पालघरमध्ये मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री ऐकमेकांकडे पाहायला तयार नाहीत. हा कसला फेविकॉलचा जोड आहे. पुढील दोन महिन्यांत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी लागेल आणि हे सरकार राज्यातून गेल्याशिवाय राहणार नाही, दोन महिन्यात हा 'फेविकॉल का जोड' तुटेल, असे राऊत म्हणाले.

विविध शासकीय योजना लाभार्थीपर्यंत पोहोचवणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’ या मोहिमेच्या पालघरमधील कार्यक्रमासाठी गुरुवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर आले. त्यावेळी शिंदे यांनी फडणवीसांशी असलेल्या मैत्रीचा भाषणात आवर्जून उल्लेख केला.

‘माझी आणि देवेंद्रजींची आताची दोस्ती नाही. गेल्या १५-२० वर्षांपासून दोस्ती आहे. ही दोस्ती जिवाभावाची आहे. आमच्या दोघांचं बॉन्डिंग मजबूत आहे. ये फेविकॉल का जोड है, तुटेगा नही. तुटणार नाही. कितीही प्रयत्न केला तरी. काही म्हणतात जय-विरू की जोडी, काही जण धरम-वीरची जोडी म्हणतात. ही जोडी खुर्चीसाठी, स्वार्थासाठी झालेली नाही. स्वार्थासाठी एकत्र झाले होते त्यांना जनतेने बाजूला केले,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.

फडणवीस यांनीही एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेली २५ वर्षे एकत्र प्रवास करत असून गेल्या वर्षभरापासून हा प्रवास अधिक घट्ट झाल्याचा उल्लेख आपल्या भाषणात केला. ‘हे सरकार खुर्च्या तोडण्यासाठी किंवा पद मिळवण्यासाठी स्थापन झालेले नसून सर्वसामान्य जनतेच्या जीवनात सामाजिक, आर्थिक परिवर्तन घडवून व गुणात्मक बदल होईपर्यंत सरकार कायम राहील,’ असे ते म्हणाले.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT