Vishwajeet kadam-Vishal Patil-Uddhav Thackeray Sarkarnama
देश

Uddhav Thackeray : "चंद्रहारच्या पराभवाचं शल्य, पण...", विशाल पाटील अन् विश्वजित कदमांच्या भेटीनंतर ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

Akshay Sabale

Uddhav Thackeray Latest Speech : सांगलीत लोकसभेला भाजप आणि शिवसेनेच्या ( ठाकरे गट ) उमेदवारांना पराभूत करत अपक्ष विशाल पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला होता. ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या पराभवानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली होती. यातच खासदार विशाल पाटील आणि काँग्रेसचे आमदार, विश्वजित कदम यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.

शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) हे तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे आज उपराष्ट्रपती जगदीप धनखड, काँग्रेस नेत्या, सोनिया गांधी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवारसाहेब आणि अन्य नेत्यांची भेट घेणार आहेत.

त्यापूर्वीच खासदार विशाल पाटील ( Vishal Patil ) आणि विश्वजित कदम यांनी खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. यावेळी आमदार मिलिंद नार्वेकर हे सुद्धा उपस्थित होते.

या भेटीबद्दल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "चंद्रहार पाटील यांच्या पराभवाचं शल्य आहे. पण, सांगलीत भाजपचा पराभव झाला, हे महत्वाचं आहे," असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, "विशाल पाटील, विश्वजित कदम आणि चंद्रहार पाटील ही तरूण मुलं आहेत. कुठे चूक झाली, तर मनात दु:ख धरून ठेवणारा मी नाही. सांगलीत घडायला नको होते, ते घडलं. पण, भले आम्ही वेगळे लढलो, चंद्रहार पाटील यांचा पराभव झाला, तरी तिकडे भाजपचा पराभव झाला, हे महत्वाचं आहे."

"चंद्रहार पाटील यांच्या पराभवाचं शल्य आहेच. विशाल पाटील महाविकास आघाडीत आले आहेत. आम्ही एकत्रच राहू," असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

लोकसभेला सांगली मतदार संघात राजकीय वातवारण तापलं होतं. काँग्रेसकडून विशाल पाटील तयारी करत असतानाच ठाकरे गटानं ऐनवेळी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित केली होती. अनेक प्रयत्नानंतरही उमेदवारी मिळवण्या अपयश आल्यानं विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीत बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढली. यात विशाल पाटील 'हॅटट्रिक' करू पाहणाऱ्या संजयकाका पाटील आणि चंद्रहार पाटील यांचा पराभव केला होता.

कुणाला किती मते?

लोकसभेला विशाल पाटील यांना 5 लाख 69 हजार 687 मते मिळाली. तर, प्रतिस्पर्धी भाजपचे संजयकाका पाटील यांना 4 लाख 68 हजार 593 मते मिळाली. त्यामुळे विशाल पाटील हे 1 लाख 1 हजार 94 मतांनी विजयी झाले. तसेच, ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना केवळ 55 हजार मते मिळाली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT