Prmod Gupta joins BJP Sarkarnama
देश

भाजपचं जशासं तसं उत्तर! अखिलेश यादवांना घरातूनच आणखी एक धक्का

सरकारनामा ब्युरो

लखनौ : विधानसभा निवडणुकीच्या (UP Election 2022) तोंडावर उत्तर प्रदेशातील राजकारणाने वेग पकडला असून, मोठ्या घडामोडी घडत आहेत. भाजपमध्ये फाटाफूट करणाऱ्या अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांना त्यांच्या घरातूनच धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांच्या सूनबाई अपर्णा यादव (Aparna Yadav) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यानंतर 24 तासांतच अखिलेश यांच्या आणखी एका निकटवर्तीयाला भाजपने फोडून धक्का दिला आहे.

अपर्णा यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर 24 तासांतच अखिलेश यादवांना मोठा धक्का बसला आहे. मुलायमसिंह यांचे साडू माजी आमदार प्रमोद गुप्ता यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मीकांत वायपेयी यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला. यानंतर त्यांनी अखिलेश यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, अखिलेश यादव यांना स्तुतीपाठकांनी घेरले आहे. मुलायमसिंह हे आता वृद्ध झाले असून, त्यांचे आता अखिलेश यांच्यासह पक्षातील कुणीही ऐकत नाही. त्यांना अखिलेश यांनी बंदी बनवले आहे. अखिलेश यांनी मुलायम यांना खूप रडवले आहे. आज मुलायम यांची ही अवस्था अखिलेश यांच्यामुळेच आहे. समाजवादी पक्ष माफियांना आश्रय देत आहे. अशा पक्षात राहण्यात आता काहीच अर्थ नव्हता.

अपर्णा यांनी सगळ्यांनाच धक्का देत भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेवसिंह यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. मागील काही दिवसांत समाजवादी पक्षाने भाजपचे तीन मंत्री आणि आठ आमदार फोडल्याने प्रत्युत्तर देण्याची भाजपने तयारी चालवली होती. आता अखिलेश यांच्या भावाच्या पत्नीला फोडून भाजपने मोठा धक्का दिला आहे. अपर्णा यांनी लखनौ कॅन्टोन्मेंटमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. (Aparna Yadav joins BJP)

मुलायमसिंह यांच्याऐवजी आता त्यांचे पुत्र व माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे समाजवादी पक्षाची (Samajwadi Party) धुरा सांभाळत आहेत. मुलायमसिंह यांचे दुसरे पुत्र प्रतिक यांच्या अपर्णा या पत्नी आहेत. अपर्णा यादव यांचा राजकीय प्रभाव फारसा नसला तरी त्या समाजकारणात खूप आधीपासून सक्रिय आहेत. त्या 'बीअवेअर' नावाची सामाजिक संस्था चालवतात. ही संस्था निराधार महिलांसाठी काम करते. याचबरोबर ही संस्था लखनौमध्ये गोशाळा चालवते. राज्यात भाजप विरुद्ध समाजवादी पक्ष अशी थेट लढत असताना अपर्णा यांच्या पक्षांतरामुळे खळबळ उडाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT