Chandrashekhar Guruji Latest News
Chandrashekhar Guruji Latest News Sarkarnama
देश

पाच कोटींसाठी विश्वासू साथीदारानेच केला चंद्रशेखर गुरुजींचा खून; तपासातून धक्कादायक खुलासा

सरकारनामा ब्यूरो

Chandrashekhar Guruji News : सरल वास्तुतज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजी (Chandrashekhar Guruji) यांच्या खुनामागे पाच कोटींची मालमत्ता विकल्याचा विषय कारणीभूत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. अनेक दिवसांपासून बेनामी मालमत्ता विकून पाच कोटी देण्यासाठी दबाव आणणाऱ्या महांतेश शिरूर याने गुरुजींचा खून केल्याचे उघड झाले आहे. (Chandrashekhar Guruji Latest Marathi News)

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर यांच्यासाठी सर्वस्व अर्पण केल्यावर मालमत्तेचे पैसे का द्यायचे, अशी विचारणा मारेकऱ्याने केली आणि रागाच्या भरात मंजुनाथ मरेवाड याच्या सहकार्याने त्यांचा खून केला. चंद्रशेखर यांचा बहुतांश व्यवसाय मारेकरी महांतेश शिरूर पाहत होता. चंद्रशेखर यांनी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता त्याच्या नावावर केली होती.

मुंबईतील सरला वास्तूचे प्रमुख म्हणून काम करून शिरूर याने चंद्रशेखर यांचा विश्वास संपादन केला होता. पण, एक मालमत्ता पाच कोटींना विकल्यावरून गदारोळ झाला. यामुळे महांतेशला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आणि याच मुद्द्यावरून झालेल्या वादातून हा खून झाला.

मारेकरी महांतेश आणि वनजाक्षी यांचे प्रेमसंबंध होते. त्यातून त्यांचे लग्न झाले. चंद्रशेखर यांच्याबरोबर काम करणारा महांतेश याच्या आधी वनजाक्षी ही नोकरीला लागली. नंतर महांतेशही तेथेच कामाला लागला. त्यातूनच दोघांमध्ये प्रेम सुरू झाले. घरच्यांच्या नकळत चंद्रशेखर यांनी त्या दोघांचे लग्न लावून दिले होते. हुबळीतील जे. पी. नगरात चंद्रशेखर यांनी एक अपार्टमेंट बांधले आणि या जोडप्याने कर्ज घेऊन त्यात ३०६ क्रमांकाचा फ्लॅट घेतला. त्यानंतर चंद्रशेखर यांच्याबरोबरचे त्यांचे संबंध चार वर्षांपासून ताणले होते. सध्या रिअल इस्टेटचा व्यवसाय करणारा महांतेश हुबळी येथील फ्लॅटमध्ये दोन मुलींसह राहत आहे.

मारेकऱ्यांसाठी कवायत

पोलिसांनी मारेकऱ्यांची कवायत घेतली असून, पोलिसांकडून आरोपींची चौकशी करण्यात आली. मारेकऱ्यांनी गुरुजींचा खून केल्याची कबुली दिली. बेनामी संपत्तीच्या पार्श्वभूमीवर हा खून केल्याचे मारेकऱ्यांनी म्हटले. चंद्रशेखर यांच्याकडे किती मिळकत आहे, मालमत्ता कोठे आहे, कोणाच्या नावावर आहे, या सर्व गोष्टींची पोलिसांनी सविस्तर चौकशी सुरू केली.

दरम्यान, विश्‍वासातील दहाहून अधिक लोकांच्या नावे गुरुजींनी बेनामी मालमत्ता खरेदी केल्याचे आरोपींनी उघड केले. हुबळी-धारवाडच्या आसपास चंद्रशेखर यांची २०० एकर जमीन बेनामी असल्याचे समोर आले आहे.

एफआयआर तपशील

चंद्रशेखर गुरुजींचे पुतणे संजय अंगडी यांनी हुबळी विद्यानगर पोलिसांत तक्रार दाखल केली. २००८ पासून आरोपी महांतेश शिरूर हा गुरुजींकडे काम करीत होता. २०१५ मध्ये महांतेश शिरूर याची मुंबई येथे कंपनीचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. महांतेश कंपनीत येणाऱ्या लोकांकडून पैसे घेत असे, असा आरोप आहे. महांतेशसह २० ते २५ जण काम करीत होते. याबाबत कंपनीचे एमडी व फिर्यादी यांना समजताच त्यांनी कामावरून काढून टाकले. राग मनात धरून महांतेश शिरूर याने हुबळीतील गुरुजींच्या मालकीच्या अपार्टमेंटमध्ये भूखंड खरेदी केला होता. अपार्टमेंटमध्ये पार्किंगसाठी जागा नाही, सोलर सिस्टिम नसल्याबाबत ग्राहक न्यायालयात दावा दाखल केला होता. खटला मागे घेण्यासाठी तो पैशांची मागणी करीत होता. त्यांना धमकी देत होता. पैसे न दिल्याने त्याने खून केल्याची तक्रार संजय अंगडी यांनी पोलिसांत दिली आहे.

वीरशैव परंपरेनुसार अंत्यविधी

शहरातील शिवप्रभू ले-आउटच्या जागेत वीरशैव लिंगायत परंपरेनुसार चंद्रशेखर गुरुजी यांच्यावर आज दुपारी अंत्यविधी करण्यात आले. हुबळी येथील मूरसावीर मठाचे कोट्रेश शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली अंत्यविधी झाले. अंत्यविधीत राजकारण, उद्योग, साहित्य क्षेत्रासह गुरुजींचे हजारो भक्त सहभागी झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT