Amit Shah, Narendra Modi Sarkarnama
देश

BJP News : मोदी-शाहंच्या झंझावातात भले भले भुईसपाट : भाजपनं 6 प्रादेशिक अन् 3 राष्ट्रीय पक्षांना जवळपास संपवतं आणलं

BJP News : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने विस्तार करत अनेक राज्यांत सत्ता मिळवली. त्यामुळे प्रादेशिक पक्षांना मोठे पराभव पत्करावे लागले.

Hrishikesh Nalagune

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती भाजपची सूत्र गेल्यापासून भारताच्या राजकारणात बऱ्याच मोठ्या उलथापालथी झाल्या आहेत. मोदी यांच्या नेतृत्वात भाजपने मागील 12 वर्षांमध्ये 3 वेळा लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. देशातील विविध राज्यांमध्ये विस्तारवादी धोरण अवलंबत भाजप आणि मित्र पक्षांनी तब्बल 22 राज्यांमध्ये सत्ता स्थापन केली आहे.

भाजपच्या याच आक्रमक धोरणामुळे अनेक राज्यांत अनेक दशकांपासून सत्तेत असलेल्या बलाढ्य प्रादेशिक पक्षांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूच्या निकालांनी या यादीत आणखी मोठी नावे जोडली आहेत. जवळपास 6 प्रादेशिक आणि 3 राष्ट्रीय पक्षांना मागील 12 वर्षांत पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.

बसपाला पहिला दणका :

भाजपच्या 2014 नंतरच्या आक्रमक रणनीतीमुळे आणि 'सोशल इंजिनीअरिंग'मुळे बहुजन समाज पक्षाच्या राजकारणावर मोठा परिणाम झाला आहे. एकेकाळी उत्तर प्रदेशात स्वबळावर सत्ता स्थापन करणाऱ्या मायावतींचा पक्ष आज अस्तित्वाची लढाई लढत आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत बसपला उत्तरप्रदेशमध्ये एकही जागा जिंकता आली नव्हती. तिथे भाजपने 80 पैकी तब्बल 71 जागा जिंकून विक्रम केला होता. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत बसपाला अवघ्या 19 जागा जिंकता आल्या.

2019 मध्ये बसपाचे 10 खासदार निवडून आले, पण त्यासाठी मायावती यांना समाजवादी पक्षाची मदत घ्यावी लागली होती. 2022 च्या विधानसभा आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बसपाची धूळधाण झाली. भाजपने बसपाची व्होट बँक असलेल्या पासी, कोरी, वाल्मीकी, खटीक आणि सोनकर यांसारख्या 'नॉन-जाटव' दलित जातींना आपल्याकडे खेचले आहे. शिवाय सततच्या पराभवांमुळे पक्षाच्या अनेक मोठ्या नेत्यांनी पक्ष सोडून भाजप किंवा सपामध्ये प्रवेश केला आहे.

शिवसेनेला बसला दुसरा धक्का :

भाजपच्या आक्रमक राजकारणाचा सगळ्या पहिला धक्का बसला तो शिवसेनेला. 2014 मध्ये भाजपने शिवसेनेसोबतची युती तोडून स्वतंत्र निवडून लढवली. याचा भाजपला मोठा फायदा झाला. तब्बल 122 जागा जिंकत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. यानंतर शिवसेना भाजपसोबत सत्तेत आली पण तिथूनच शिवसेनेला उतरती कळा लागली.

शिवसेनेने २०१९ मध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता स्थापन केली. मात्र, २०२२ मध्ये भाजपने एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून शिवसेनेत उभी फूट पाडली. या ऐतिहासिक बंडामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर मूळ 'शिवसेना' पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे आले. सध्या त्यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे.

तर उद्धव ठाकरे यांना 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चमकदार कामगिरी करता आली नाही. लोकसभेला केवळ 9 जागांवर विजय मिळाला तर विधानसभेलाही फक्त 20 जागा जिंकता आल्या. आता उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष मोठ्या प्रमाणात राजकीय आव्हानांचा सामना करत आहेत.

बसपासह समाजवादी पक्षालाही झटका :

उत्तर प्रदेशातील सर्वात मोठा प्रादेशिक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाला 2017 च्या निवडणुकीत प्रचंड मोठा धक्का बसला. अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील सरकारला भाजपने सत्तेतून खाली खेचले. भाजपने 300 हून अधिक जागांसह सत्ता मिळवली. 2022 मध्येही भाजपने पूर्ण बहुमत मिळवत पुन्हा सत्ता स्थापन केली. आतापर्यंत सपाला उत्तर प्रदेशच्या सत्तेत पुनरागमन करता आलेले नाही. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र समाजवादी पक्षाने 43 जागा जिंकत दणक्यात कमबॅक केले आहे.

पीडीपीची ताकद घटली :

2015 मध्ये भाजपने जम्मू-काश्मीरमध्ये 'महबूबा मुफ्ती' यांच्या पीडीपी पक्षासोबत युती करून सरकार स्थापन केले होते. 2018 मध्ये भाजपनेच पाठिंबा काढून घेतल्याने सरकार कोसळले. आता कलम 370 हटवल्यानंतर तेथील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत. पीडीपीचा राजकीय प्रभाव ओसरला आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ओमर अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्सला सत्ता मिळाली. तर भाजप तिथे दोन नंबरचा पक्ष ठरला आहे.

डाव्यांचे राजकारण शेवटाकडे :

ईशान्य भारतातील डाव्यांचा बालेकिल्ला असलेल्या त्रिपूरात 2018 मध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया-मार्क्सवादी पक्षाच्या माणिक सरकार यांच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपने पूर्णविराम दिला. 2011 मध्ये ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये डाव्याचा मोठा पराभव केला होता. त्यानंतर भाजपने त्रिपूरामध्ये दिलेल्या धक्कामुळे डाव्यांचे राजकारणाची शेवटाकडे वाटचाल सुरु झाली.

वायएसआर काँग्रेसचं पानीपत :

2019 मध्ये 50% मते मिळवून वायएसआर काँग्रेसच्या जगन मोहन रेड्डी यांनी आंध्रप्रदेशमध्ये सत्ता स्थापन केली होती. 2024 मध्ये मात्र वायएसआर काँग्रेसला मोठा धक्का बसला. भाजप आणि चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाने पुन्हा युती केली. पवन कल्याण यांच्या जना सेना पक्षालाही या युतीमध्ये स्थान देण्यात आले. नायडू, भाजप यांच्या युतीपुढे जगन रेड्डी यांचे सरकार टिकू शकले नाही. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेसचा सर्वात मोठा पराभव झाला.

पटनायक यांच्या 24 वर्षांच्या पर्वाचा अंत :

2024 च्या ओडिसा विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक कामगिरी केली. सलग 24 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दलाचा भाजपने पराभव केला. भाजपने 78 जागा जिंकून मोहन चरण माझी यांच्या रुपाने ओडिसामध्ये आपले पहिले मुख्यमंत्री विराजमान केले. शिवाय ओडिसा राज्यातील लोकसभेच्याही 20 जागा जिंकून भाजपने केंद्रातील सत्ता कायम राखण्यात यश मिळवले.

दिल्लीत 28 वर्षांनंतर भाजप :

भाजपला 1998 पासून दिल्लीची निवडणूक जिंकला आली नव्हती. आधी काँग्रेसने तब्बल 15 वर्षे सत्ता राखली. त्यानंतर आम आदमी पक्षाने करिश्मा करत सलग तीन निवडणुका जिंकल्या. पण 2025 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'आप'ला सत्ता गमवावी लागली. भ्रष्टाचाराचे आरोप आणि 10 वर्षांच्या अँटी-इन्कम्बन्सीमुळे दिल्लीच्या मतदारांनी भाजपला पसंती दिल्याचे दिसून येते. दिल्ली महापालिकेतही भाजपने सत्ता स्थापन केली. याशिवाय नुकतंच 'आप'च्या राज्यसभेच्या 7 खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

तृणमूल काँग्रेसच्या 15 वर्षांच्या सत्तेला सुरुंग :

सोमवारी (4 मे) लागलेल्या निकालांनी देशाला थक्क केले आहे. 2011 पासून पश्चिम बंगालवर एकहाती सत्ता गाजवणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला भाजपने पराभवाची धूळ चारली आहे. भाजपला 200 हून अधिक जागा मिळाल्या असून बंगालमधील हा विजय ऐतिहासिक मानला जात आहे. खुद्द ममता बॅनर्जी यांचाही त्यांच्या बालेकिल्ल्यात पराभव झाला असून, बंगालमध्ये आता पहिल्यांदाच भाजपचे सरकार स्थापन होत आहे.

काँग्रेसनेही लावला हातभार :

भाजपच्या जोडीला काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसनेही डाव्यांचे बालेकिल्ले संपवण्यासाठी रणनीती आखल्याचे दिसून येते. 2011 मध्ये तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये माकपचा पराभव करत पहिला हादरा दिला. त्यानंतर नुकतेच केरळमध्ये काँग्रेसने माकपला धूळ चारली. काँग्रेसने यापूर्वी तेलंगणामध्ये के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीचा पराभव करून आणखी एका प्रादेशिक पक्षांच्या पराभवाला हातभार लावल्याचं दिसून येतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT