नवी दिल्ली : देशाच्या राजकारणात मोठा बदल घडवून आणण्याची शक्यता असलेल्या डिलिमिटेशन अर्थात मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या विधेयकामुळे लोकसभेच्या जागांमध्ये 50 टक्क्यांनी वाढ करण्याचा प्रस्ताव असून, महाराष्ट्रासह सर्व राज्यांच्या राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेली मंत्रिमंडळाची बैठक सुमारे 40 मिनिटे चालली. या बैठकीत संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनातील कामकाजावर चर्चा करण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार, डिलिमिटेशन विधेयकाला मंजुरी देतानाच नारी शक्ती वंदन अधिनियमाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयकालाही हिरवा कंदील देण्यात आला आहे.
देशातील सर्व राज्यांच्या लोकसभा जागांमध्ये समान प्रमाणात 50 टक्के वाढ करण्याची तरतूद आहे. जागांच्या संख्येबाबतची ही मर्यादा 2051 पर्यंत लागू ठेवण्याचा प्रस्ताव असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय, महिलांसाठी लोकसभा आणि विधानसभांमध्ये 33 टक्के आरक्षण लागू करण्याच्या दिशेनेही सरकारने पाऊल टाकले आहे.
दरम्यान, या विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष वाढला आहे. सरकारने विधेयक मंजूर करण्यासाठी आवश्यक संख्याबळ जमवल्याचा दावा सूत्रांकडून केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे 8 खासदार आणि द्रमुकचे 22 खासदार विधेयकाच्या समर्थनार्थ मतदान करू शकतात, अशी चर्चा आहे. सरकारकडे सुमारे 355 खासदारांचे समर्थन असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.
मात्र, काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोध केला आहे. आता या विधेयकाला संसदेच्या दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळते का आणि डिलिमिटेशनमुळे देशासह महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांची संख्या किती वाढते, याकडे देशाचे लक्ष लागले आहे. मात्र, प्रस्ताव मंजूर होणे आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे या दोन वेगळ्या प्रक्रिया आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.