Delimitation bill 2026 : मोदी सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत; कोणत्या राज्यात किती जागा वाढणार?

State wise Lok Sabha seats increase after delimitation : मोदी सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. परिसीमन झाल्यास महाराष्ट्रासह देशातील कोणत्या राज्यात लोकसभेच्या किती जागा वाढू शकतात? जाणून घ्या सविस्तर माहिती.
Delimitation bill 2026 : मोदी सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत; कोणत्या राज्यात किती जागा वाढणार?
Sarkarnama
Published on: 
Updated on: 

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा टप्पा बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबरदरम्यान संसदेचे कामकाज होणार आहे. या अधिवेशनात बहुचर्चित मतदारसंघ पुनर्रचना (डिलीमिटेशन) विधेयक आणि महिला आरक्षणाशी संबंधित १३१ वे घटनादुरुस्ती विधेयक सुधारित स्वरूपात पुन्हा मांडले जाण्याची शक्यता आहे. ५० टक्के जागावाढीच्या सूत्रानुसार पुनर्रचना झाल्यास महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांची संख्या ४८ वरून ७२ होऊ शकते.

संसदेचे पावसाळी अधिवेशन १३ ऑगस्ट रोजी अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले होते. मात्र, राष्ट्रपतींकडून अधिवेशन औपचारिकरीत्या संस्थगित करण्यात आले नव्हते. आता सरकारने अचानक पुन्हा संसदेचे कामकाज बोलावल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपल्या खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हीप बजावला आहे.

लोकसभेची कमाल सदस्यसंख्या ८५० करण्याचा प्रस्ताव

मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभेची कमाल सदस्यसंख्या मर्यादा ५५० वरून ८५० करण्याचा प्रस्ताव आहे. त्यापैकी राज्यांसाठी ८१५, तर केंद्रशासित प्रदेशांसाठी ३५ जागांची कमाल मर्यादा प्रस्तावित आहे. सर्व राज्यांच्या जागांमध्ये समान प्रमाणात वाढ केल्यास लोकसभेतील प्रत्येक राज्याचा प्रतिनिधित्वाचा सध्याचा टक्केवारीतील हिस्सा जवळपास कायम राहू शकतो.

कोणत्या राज्यात किती जागा वाढू शकतात?

उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या जागांची संख्या ८० वरून १२०, तर महाराष्ट्रातील जागांची संख्या ४८ वरून ७२ होऊ शकते. पश्चिम बंगालमध्ये ४२ वरून ६३, बिहारमध्ये ४० वरून ६०, मध्य प्रदेशात २९ वरून ४३ ते ४४, गुजरातमध्ये २६ वरून ३९, राजस्थानमध्ये २५ वरून ३७ ते ३८, तर ओडिशामध्ये २१ वरून ३१ ते ३२ जागा होऊ शकतात.

Delimitation bill 2026 : मोदी सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत; कोणत्या राज्यात किती जागा वाढणार?
Nashik Court Bomb Threat: नाशिक जिल्हा न्यायालयात बॉम्ब असल्याच्या फोनने खळबळ; पण शेवटी 'लकी' आणि 'अल्फा'ने असं काही केलं की...

दक्षिणेकडील राज्यांमध्ये किती जागा वाढणार?

तमिळनाडूमध्ये लोकसभेच्या जागांची संख्या ३९ वरून ५८ ते ५९, कर्नाटकमध्ये २८ वरून ४२, आंध्र प्रदेशात २५ वरून ३७ ते ३८, केरळमध्ये २० वरून ३०, तर तेलंगणामध्ये १७ वरून २५ ते २६ होऊ शकते. सध्या दक्षिणेकडील या पाच राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण १२९ जागा आहेत.

अन्य राज्यांतील जागांचे गणित काय?

झारखंड आणि आसाममध्ये प्रत्येकी १४ वरून २१, पंजाबमध्ये १३ वरून १९ ते २०, छत्तीसगडमध्ये ११ वरून १६ ते १७, हरियाणामध्ये १० वरून १५, उत्तराखंडमध्ये पाचवरून सात ते आठ, तर हिमाचल प्रदेशात चारवरून सहा जागा होऊ शकतात. अरुणाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये प्रत्येकी दोनवरून तीन जागा होऊ शकतात. मिझोरम, नागालँड आणि सिक्कीम या राज्यांमध्ये सध्या प्रत्येकी एक जागा असून, ती कायम राहू शकते किंवा दोनपर्यंत वाढू शकते.

केंद्रशासित प्रदेशांमध्ये किती जागा वाढणार?

दिल्लीतील लोकसभेच्या जागांची संख्या सातवरून १० ते ११, जम्मू आणि काश्मीरमध्ये पाचवरून ७ ते ८, तर दादरा-नगर हवेली व दमण-दीवमध्ये दोनवरून ३ होऊ शकते. लडाख, पुदुच्चेरी, चंदीगड, अंदमान आणि निकोबार तसेच लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशांमध्ये सध्या प्रत्येकी एक जागा असून, ती कायम राहू शकते किंवा दोनपर्यंत वाढू शकते.

दक्षिणेकडील राज्यांची चिंता दूर होणार?

लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेवरून दक्षिण भारतातील राज्यांनी यापूर्वी आक्षेप घेतले आहेत. लोकसंख्या नियंत्रणात यश मिळवलेल्या राज्यांचे लोकसभेतील राजकीय प्रतिनिधित्व कमी होऊ नये, अशी या राज्यांची प्रमुख मागणी आहे.

Delimitation bill 2026 : मोदी सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत; कोणत्या राज्यात किती जागा वाढणार?
Latur Crime : वाळू माफियांनी तलाठ्यांना दिले चाबकाचे फटके; गुन्हा दाखल न करता जीव मुठीत घेऊन पळाले

सध्या तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ आणि तेलंगणा या पाच राज्यांमधून लोकसभेवर एकूण १२९ खासदार निवडून जातात. लोकसभेच्या एकूण सदस्यसंख्येत या राज्यांचा हिस्सा २३.७६ टक्के आहे.

समान ५० टक्के जागावाढीचे सूत्र लागू झाल्यास दक्षिणेकडील या पाच राज्यांच्या जागांची संख्या सुमारे १९४ ते १९५ पर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे लोकसभेतील त्यांचा सध्याचा टक्केवारीतील हिस्सा जवळपास कायम राहू शकतो. मात्र, सुधारित विधेयकात सरकार नेमके कोणते सूत्र मांडणार, यावर दक्षिणेकडील राज्यांची भूमिका अवलंबून असेल.

महिला खासदारांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढणार?

मतदारसंघ पुनर्रचनेसोबत महिला आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरणार आहे. लोकसभेच्या जागांची संख्या सुमारे ८१५ पर्यंत वाढली आणि त्यामध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण लागू झाले, तर सुमारे २७२ महिला खासदार लोकसभेवर निवडून येऊ शकतात. महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांची संख्या ७२ झाल्यास त्यापैकी २४ जागा महिलांसाठी आरक्षित होऊ शकतात. त्यामुळे राज्यातील राजकीय पक्षांच्या उमेदवारीच्या गणितातही मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

मोदी सरकारसमोर दोन-तृतीयांश बहुमताची कसोटी

घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी केंद्र सरकारला संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष बहुमताची आवश्यकता आहे. सध्या लोकसभेच्या ५४३ पैकी तीन जागा रिक्त असल्याचे गृहीत धरल्यास विद्यमान सदस्यसंख्या ५४० आहे. सर्व ५४० सदस्यांनी उपस्थित राहून मतदान केल्यास विधेयक मंजूर करण्यासाठी किमान ३६० मतांची आवश्यकता असेल. सत्ताधारी एनडीएकडे सुमारे ३२० खासदारांचे संख्याबळ असल्याने सर्व विद्यमान सदस्यांनी मतदान केल्यास सरकारला आणखी सुमारे ४० खासदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता भासू शकते. त्यामुळे विरोधी आणि प्रादेशिक पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.