Navneet Kaur-Rana Sarkarnama
देश

Navneet Rana : केंद्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी; लोकसभेत नवनीत राणा आक्रमक

Navneet Rana Speech In Lok Sabha : खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेमध्ये मराठीतून मांडल्या विदर्भासह महाराष्ट्राच्या व्यथा...

प्रसन्न जकाते

Parliament Winter Session 2023 : 'अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आमच्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. सध्या आमच्या विदर्भाचा आणि महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. त्यांच्या शेतातील पिके नष्ट झाली आहेत. त्यामुळे मी विनंती करते साहेब की, केंद्र सरकारने विदर्भासह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत करावी', अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत मराठीतून सरकारकडे ही विनंती केली.

संसदेचे हिवाळी अधिवेशन सध्या नवी दिल्ली येथे सुरू आहे. लोकसभेत बोलताना खासदार नवनीत राणा यांनी मराठीतून सरकारपुढे विदर्भासह महाराष्ट्राच्या व्यथा मांडल्या.

नैसर्गिक संकटामुळे शेतीचे पूर्ण चक्र बिघडले आहे. अशात शेतकऱ्यांना तातडीने मदत गरजेची आहे. या विषयावर बोलताना नवनीत राणा यांनी सुरुवातीला हिंदीतून विषयाची मांडणी केली. परंतु थोड्याच वेळात त्यांनी माय मराठीतून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. आमच्या शेतकऱ्यांचे कंबरडे पार मोडले आहे. त्यांना नितांत मदतीची गरज आहे साहेब. केंद्र सरकारने आता त्यांना मदत केली पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी लोकसभेतून केंद्र सरकारकडे केली.

महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारचं कौतुक करताना खासदार राणा म्हणाल्या की, अवकाळी पाऊस आणि गारपिटीनंतर केंद्र सरकार आपली जबाबदारी पार पाडत आहे. शेतकऱ्यांना मदत करता यावी, यासाठी पंचनामा करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदत मिळेल, अशी अपेक्षा आहे. परंतु या सगळ्यात केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी लोकसभेत व्यक्त केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शेतीचे नुकसान झाल्यावर शेतकऱ्यांना सरकारकडे पाहण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी पीकविमा योजना लागू केली आहे, परंतु विमा कंपन्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुढे येत नाहीत. अनेक कंपन्यांनी शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनेचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नाही. सरकारनी यासंदर्भातही योग्य ती पावले उचलायला पाहिजेत, अशी भूमिकाही खासदार नवनीत राणा यांनी मांडली.

आमच्या विदर्भातील व महाराष्ट्रातील शेतकरी फार साधा आणि गरीब आहे साहेब. त्यामुळे केंद्र सरकारने त्यांना मदत केली पाहिजे, अशी आपली भूमिका आहे. केंद्र सरकार जनतेच्या हितासाठी अनेक योजना राबवत आहे. अशात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही. शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. अन्नदाता जेव्हा संकटात असतो, त्यावेळी त्याच्या मदतीला धावून जाणे ही त्याच्या भराेशावर पालनपोषण करणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत केलीच पाहिजे, असा आग्रहदेखील खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत केलेल्या आपल्या मराठी भाषणातून केला. नवनीत राणा यांनी लोकसभेत केलेले हे मराठी भाषण सध्या सोशल माध्यमांवर व्हायरल झाले आहे.

Edited by Sachin Fulpagare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT