Seetakka Sarkarnama
देश

Telangana Assembly : नक्षलवादी ते कॅबिनेट मंत्री ! मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींच्या मंत्रिमंडळातील सीताक्का...

Anand Surwase

Telangana Vidhansbha Election : तेलंगणा विधानसभेत गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या बीआरएसचा सफाया करीत काँग्रेसने मोठा विजय मिळवला. तेलंगणा राज्याची स्थापना झाल्यानंतर तब्बल दहा वर्षांनंतर काँग्रेसला या ठिकाणी सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली. काँग्रेसने विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून रेवंथ रेड्डी यांनी शपथ घेतली.

राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन यांनी रेवंथ रेड्डी यांच्यासह उपमुख्यमंत्री म्हणून मल्लू भट्टी विक्रमार्क यांना शपथ दिली. मुख्यमंत्री रेड्डी यांच्या मंत्रिमंडळामध्ये दोन महिला आमदारांनाही कॅबिनेट मंत्रिपदाची संधी देण्यात आली. यातील मुलुगूच्या आमदार दनसारी अनुसया ऊर्फ सीताक्का यांचा राजकीय प्रवास हा नक्षलवादी ते कॅबिनेट मंत्री असा झाला आहे.

हैदराबादमध्ये काँग्रेसचे नेते रेवंथ रेड्डी (Revanth Reddy) यांनी मुख्यमंत्री पदाची, तर इतर बारा जणांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. त्यामध्ये मुलुगू विधानसभा मतदारसंघाच्या आदिवासी समाजाचे नेतृत्व करणाऱ्या महिला आमदार सीताक्का यांना कॅबिनेटमंत्री म्हणून संधी दिली. सीताक्का यांचा जीवनप्रवास खूपच संघर्षमय आहे. राजकारणात येण्यापूर्वी दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या सीताक्का या 1988 मध्ये नक्षलवादी चळवळीत सहभागी झाल्या होत्या. तिथे त्यांनी नक्षलवाद्यांच्या कमांडर पदापर्यंत मजल मारली होती.

या दरम्यानच पोलिसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये सीताक्का यांचा भाऊ आणि वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर नक्षली चळवळ सोडून देण्याचा निर्धार करत त्यांनी आत्मसमर्पण केले. त्यानंतर त्यांनी समाजसेवक म्हणून नेतृत्व करत संयुक्त आंध्र प्रदेशातील चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील आदिवासी नागरिकांसाठी काम करायला सुरुवात केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुलुगू जिल्ह्यात आदिवासी नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे काम करत असताना सीताक्काची लोकप्रियता वाढली. तसेच त्यांनी अनेक नक्षलींना आत्मसमर्पण करण्यासही प्रोत्साहित केले. त्यांची वाढती लोकप्रियता पाहून 2009 पहिल्यांदा तेलगू देसम पक्षाने त्यांना मुलुगू मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले. या वेळी सीताक्का बहुमताने निवडून येत विधानसभेत दाखल झाल्या. त्यानंतर आंध्र प्रदेशचे विभाजन झाल्यानंतर त्यांनी टीडीपी पक्षाला राम राम केला आणि रेवंथ रेड्डी यांच्या सोबत काँग्रेसचे काम सुरू केले. दरम्यान, सीताक्का यांनी 2022 ओस्मानिया विद्यापीठात राज्यशास्त्र विषयातून पीएचडी केली आहे.

विजयाची हॅटट्रिक

काँग्रेसमध्ये (Congress) सहभागी झाल्यानंतर स्वंतत्र तेलंगणात सीताक्का यांनी मुलुगूमधून निवडणूक लढवत विजयाची हॅटट्रिक केली. या निवडणुकीत मुलुगू मतदारसंघातून सीताक्का या 33 हजार 700 मतांनी विजयी झाल्या. त्यानंतर गुरुवारी त्यांनी रेवंथ सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

(Edited by Sachin Waghmare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT