Revanth Reddy: रेवंथ रेड्डीजी, महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनाही पेटून उठायला शिकवा!

Maharashtra Congress : जनतेच्या समस्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा काँग्रेस नेत्यांना विसर पडला आहे.
Revanth Reddy
Revanth ReddySarkarnama
Published on
Updated on

पक्षांतर्गत आणि बाहेरच्या शत्रूंना खंबीरपणे तोंड देत तो लढला, विधानसभा निवडणुकीत पक्षाला बहुमत मिळवून दिले आणि त्याची मुख्यमंत्रिपदी वर्णीही लागली. रेवंथ रेड्डी, काँग्रेसचे तेलंगणा प्रदेशाध्यक्ष आणि नियोजित मुख्यमंत्री! महाराष्ट्रात काँग्रेसची काय स्थिती आहे? मरगळ आहे. संरजामी नेते महत्वाची पदे अडवून बसले आहेत.

नाना पटोले यांचा हवेत गोळीबार सुरू असतो, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचीही तशीच तऱ्हा. प्रदेश कार्याध्यक्ष तर बिनकामाचेच...नानाभाऊ आपण म्हणता, युती सरकारचे हे अधिवेशन शेवटचे असे. कशाचा बळावर बोलता हे? रेवंथ रेड्डी यांच्याप्रमाणे कितीवेळा आपण रस्त्यावर उतरला आहात? लोकांचे प्रश्न घेऊन तुमचा कोणताही नेता रस्त्यावर उतरत नसेल तर तुम्हाला लोकांनी मते का द्यावीत?

रेवंथ रेड्डी यांनी २०१७ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळेसपासून त्यांनी झोकून देऊन काम केले. आक्रमक कार्यशैली आणि अमोघ वकृत्वशैलीमुळे ते गर्दी खेचणारे नेते बनले. २०२१ मध्ये काँग्रेसने त्यांना प्रदेशाध्यक्ष केले. त्यावेळी तेलंगणातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी संताप, नाराजी व्यक्त केली होती, मात्र पक्षश्रेष्ठींनी त्याकडे लक्ष दिले नाही. तत्कालीन मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी रेवंथ यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. रेड्डी यांच्या कामाची पद्धत अत्यंत आक्रमक होती, जनतेच्या प्रश्नांना भिडणारी होती. जनतेच्या प्रश्नांसाठी ते सातत्याने आक्रमकपणे रस्त्यावर उतरले, आंदोलने केली, मोर्चे काढले.

Revanth Reddy
Chhagan Bhujbal News: सगळेच मराठा कुणबी होणार..; मराठा शिल्लकच राहणार नाहीत !

निवडणुकीच्या काळात गावोगावी रेवंथ रेड्डी यांचीच चर्चा होती. त्यापूर्वी बीआरएसला तेलंगणात आव्हानच नाही, असे चित्र होते. त्यामुळे केसीआरही निश्चिंत होते. मात्र रेवंथ रेड्डी यांच्या आक्रमक कार्यशैलीमुळे काँग्रेस सत्तेच्या स्पर्धेत आली. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष बंडी संजयकुमार यांनीही त्यांच्या पक्षाला स्पर्धेत आणले होते, मात्र त्यांचा आधार होता हिंदुत्व. रेवंथ रेड्डी लोकांच्या अडीअडचणींवर बोलत होते, त्यांनी लोकांशी भावनिक नाते निर्माण केले होते. धडाकेबाज भाषणांनी त्यांनी अनेक प्रचारसभा गाजवल्या. परिणामी काँग्रेस सत्तेत आली. पक्षश्रेष्ठींनी टाकलेला विश्वास रेड्डी यांना सार्थ ठरवला. सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांना निवडणुकीत पुढे केल्याचा फायदा काँग्रेसला कर्नाटकात मिळाला होता. त्यानुसारच काँग्रेसने रेड्डी यांना समोर आणले होते. विरोधकांसह पक्षांतर्गत विरोधकांचा सामना करत रेड्डी यांनी काँग्रेसला सत्तेच्या दारात नेऊन सोडले आहे.

आता पाहा महाराष्ट्रात काय होते आहे. कुठे आहेत प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ, कुठे आहेत प्रदेश कार्याध्यक्ष आणि अन्य पदाधिकारी? महाराष्ट्रात समस्या नाहीत का? यंदाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनावर काँग्रेसने एकही मोर्चा आयोजित केलेला नाही. लोकांना अडचणींचा सामना करावा लागत नाही का? नानाभाऊ नुकतेच म्हणाले आहेत, की महायुती सरकारचे हे शेवटचे हिवाळी अधिवेशन ठरणार आहे. लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी, त्या सोडवण्यासाठी एकदाही रस्त्यावर न उतरणाऱ्या नेत्यांमध्ये इतका आत्मविश्वास नेमका कुठून येत असावा? विरोधी पक्षनेते वडेट्टीवार हेही आक्रमक वक्तव्ये करण्यातच धन्यता मानतात.

पावसाअभावी शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत. त्यांच्यासाठीही हे लोक रस्त्यावर उतरलेले नाहीत. तेलंगणा वगळता अन्य तीन राज्यांत काँग्रसचे झालेले हाल लक्षात घेऊन तरी राज्यातील पदाधिकारी स्वतःमध्ये बदल करतील की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बसवराज पाटील (मुरुमकर) हे काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आहेत. धाराशिव या त्यांच्या जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले आहे, महामार्गाची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे अपघात होत आहेत. टोलवसुली मात्र सुरूच आहे. बसवराज पाटील हे हा प्रश्न घेऊन एकदाही रस्त्यावर उतरलेले नाहीत. मग लोकांचा या नेत्यांवर विश्वास कसा बसेल?

शरद पवार हे सतत लोकांमध्ये मिसळतात..

महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याविषयी जनतेत मोठी सहानुभूती निर्माण झाली होती. अजित पवार यांचा गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर शरद पवार यांनाही सहानुभूती मिळाली. ती टिकवून ठेवायची असेल तर या नेत्यांनाही रस्त्यावर उतरावे लागेल. शरद पवार हे सतत लोकांमध्ये मिसळतात, त्यांच्या अडचणी जाणून घेतात. उद्धव ठाकरे यांनाही असेच करावे लागणार आहे. महाविकास आघाडीतील कोणताही पक्ष एकट्याने भाजपचा सामना करू शकत नाही. निवडणूक तोंडावर आली असतानाही महाविकास आघाडीतील पक्षांकडून एकीचे म्हणावे तसे प्रदर्शन केले जात नाही.

Revanth Reddy
Praniti Shinde News : घडीभर थांबून लेकीनं बापाची धाप ऐकली...

हे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावे...

नाना पटोले यांनी किमान यासाठी तरी पुढाकार घेतला पाहिजे. पेटून कसे उठायचे, हे नानाभाऊ आणि काँग्रेसच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी रेवंथ रेड्डी यांच्याकडून शिकायला हवे. हे शक्य नसलेल तर काँग्रेस हायकमांडने नानाभाऊ यांच्यासह महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना हैदराबादला पाठवून त्यांच्या प्रशिक्षणाची सोय केली पाहिजे. भाजपच्या विरोधात रस्त्यावर उतरले तर ईडी, सीबीआय मागे लागतील, अशी भीती वाटत असेल तर संबंधित पदाधिकाऱ्यांनी पदांचे राजीनामे देऊन तरुणांसाठी दारे खुली केली पाहिजेत.शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे माजी मंत्री अनिल देशमुख जेलमध्ये जाऊन आले आहेत, ते आणखी तावून-सुलाखून निघाले आहेत, हे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे.

Revanth Reddy
Revanth Reddy : तेलंगणात काँग्रेसला 'हात' देणारे रेवंथ रेड्डी आहेत तरी कोण ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com