Shiv Sena, NCP Sarkarnama
देश

राष्ट्रवादीचा एकमेव उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर; शिवसेना तळात

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेनेही उमेदवार उतरवले होते.

सरकारनामा ब्युरो

लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Election 2022) रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व शिवसेनेनेही उमेदवार उतरवले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने अनुपशहर मतदारसंघातून ज्येष्ठ नेते के. के. शर्मा (K. K. Sharma) यांना उतरवलं आहे. पण सुरूवातीच्या कलांमध्ये शर्मा हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या मतदारसंघात भाजपने (BJP) आघाडी घेतली आहे. शिवसेनेने या मतदारसंघात उमेदवार उतरवला होता. मतदारसंघातील एकूण 11 उमेदवारांत शिवसेना तळाला आहे.

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. पण संपूर्ण देशाला उत्तर प्रदेशच्या निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे. राज्यात एकूण 403 जागांसाठी निवडणूक झाली आहे. राज्यात राष्ट्रवादीचा एकमेव उमेदवार आहे. तर शिवसेनेचे 37 उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेचा (Shiv Sena) एकही उमेदवार आघाडीवर नसल्याचे सुरूवातीच्या कलांमध्ये दिसत आहे. (UP Election Result Update)

निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील सकाळी दहा वाजेपर्यंतच्या माहितीनुसार अनुपशहर मतदारसंघात राष्ट्रवादीचे शर्मा यांना 1122 मतं मिळाली आहेत. तर शिवसेनेच्या उमेदवार रेश्मा यांना केवळ तीन मतं मिळाली आहेत. विशेष म्हणजे नोटाला 25 मतं मिळाली आहेत. अनुपशहरमध्ये भाजपचे संजय कुमार शर्मा 3 हजार 574 मतांसह आघाडीवर आहेत.

भाजपने गाठली मॅजिक फिगर

उत्तर प्रदेशात भाजपने 202 ची मॅजिक फिगर पार केल्याचे सुरूवातीच्या कलांनुसार दिसत आहे. समाजवादी पक्षालाही शंभरच्या जवळपास जागा मिळाल्या आहेत. या राज्यात मागील 37 वर्षात कोणत्याही पक्षाला सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळालेली नाही. मतमोजणीतील सुरूवातीचे कल पाहिल्यास भाजप इतिहास घडवणार असल्याचे दिसते. बीएसपी आणि काँग्रेस स्पर्धेत कुठेच नसल्याचे दिसत आले. योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान होतील, असं जवळपास स्पष्ट झालं आहे.

एक्झिट पोलमध्ये (Exit Polls) भाजपला (BJP) दोनशेहून अधिका जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात दोन महिन्यांच्या कालावधीत सात टप्प्यांत निवडणूक झाली. या निवडणुकीत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि सत्ताधारी भाजपमध्ये सामना पाहायला मिळाला. तीन एक्झिट पोलमध्ये भाजपला दोनशेहून अधिक जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एनडीटीव्हीने सर्व एक्झिट पोलची सरासरी काढली असून, भाजपला 240 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. समाजवादी पक्षाला (Samajwadi Party) 143, बहुजन समाज पक्षाला (BSP) 15 तर काँग्रेसला (Congress) 5 जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मागील निवडणुकीतील स्थिती -

भाजप - 312 (अपना दल 9, सुहेलदेव भारतीय समाज पार्टी 4) - 325

समाजवादी पक्ष - 47

बसपा - 19

काँग्रेस - 7

राष्ट्रीय लोकदल - 1

इतर - 4

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT