मुंबई : केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या पुणे दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं गॅस दरवाढीविरोधात (LPG Price Hike) जोरदार आंदोलन केलं होतं. त्यांच्या बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमातही राडा झाला. त्यानंतर आता गॅस दरवाढीवरून राष्ट्रवादीकडून इराणींना पुन्हा लक्ष्य करण्यात आलं आहे. त्यांच्यासाठी राष्ट्रवादीनं नवी A, B, C, D... तयार केली आहे. वि’स्मृती’चा इलाज इराणींनी लवकर शोधावा, असा टोलाही लगावण्यात आला आहे. (Union Minister Smriti Irani Latest Marathi News)
राष्ट्रवादी काँग्रेसने स्मृती इराणींचे युपीए सरकारच्या काळातील 2011 मधील एक ट्विट शेअर करत टीका केली आहे. त्यावेळी गॅसचे दर 50 रुपयांनी वाढल्यानंतर इराणींनी सरकारविरोधात आंदोलन केले होते. याच ट्विटचा आधार घेत राष्ट्रवादीनं इराणींना डिवचले आहे. (NCP criticizes Union Minister Smriti Irani)
'श्रीमती स्मृती इराणीजी, तुमचं A for Amethi आणि B for Baramati बोलून झालं असेल तर जरा C for Cylinder, D for Diesel, E for Electricity, F for Fuel आणि G for Gas वर पण बोलाल का? पंतप्रधान स्वतःला फकीर म्हणवून घेतात, मग आता जनतेलाही तुम्ही फकीर करणार का, असा सवाल राष्ट्रवादीने केला आहे.
दोन दिवसांपूर्वी गॅसच्या दरात साडे तीन रुपयांनी वाढ झाली. त्यावर अच्छे दिन आएंगे म्हणत सत्तेत आलेल्या मोदी सरकारने देशाला दुःस्वप्न दाखवले. देशभरात महागाई माजली असता दिलासा मिळण्याऐवजी सर्वसामान्यांना पुन्हा एकदा एलपीजी सिलिंडरच्या दरवाढीचा झटका केंद्र सरकारने दिला आहे, अशी टीका राष्ट्रवादीने केली आहे.
सत्तेत येण्यापूर्वी घरगुती गॅसमध्ये पन्नास रुपयांची वाढ झाल्यावरही भाजप आकाशपाताळ एक करत होता. विद्यमान केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सिलिंडर घेऊन आंदोलने केली होती. त्याच स्मृती इराणी आता घरगुती सिलिंडरचे भाव हजारावर गेल्यावर चकारही काढायला तयार नाहीत, असं राष्ट्रवादीनं म्हटलं आहे.
स्मृतीजींनी विमान प्रवासात एका ताईंनी काही दिवसांपूर्वी गॅसदरवाढीवर प्रश्न विचारला असता त्यांच्या तोंडातून शब्दही फुटेनासा झाला होता. एकूणच सत्तेत येण्यापूर्वी गृहिणींच्या प्रश्नांचा कळवळा असल्याचे दाखविणाऱ्या स्मृती इराणींना आता गृहिणींची चिंता दिसेनाशी झालेली दिसते. वि’स्मृती’चा इलाज स्मृती इराणींनी लवकर शोधावा अन्यथा देशातील गृहिणी त्यांना कधी माफ करणार नाहीत, असं राष्ट्रवादीने फटकारले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.