Waqf Amendment Bill : वक्फ सुधारणा विधेयक अखेर संसदेच्या दोन्ही सभागृहात संमत झाले आहे. गुरुवारी मध्यरात्री लोकसभेमध्ये तर शुक्रवारी मध्यरात्री राज्यसभेमध्ये विधयकावर मतदान पार पडले. तत्पूर्वी दोन्ही सभागृहांमध्ये या विधेयकावर मॅरेथॉन चर्चा झाली. यात सर्वच पक्षांनी त्यांची बाजू मांडली. पण लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी चर्चेत सहभाग न घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचीच भूमिका काय हे स्पष्ट होत नव्हते. अखेरीस राज्यसभेमध्ये खासदार प्रफुल्ल पटेल यांनी या विधेयकाच्या बाजूने खणखणीत भाषण करत विधेयकाला पाठिंबा दर्शविला. त्यामुळे अखेरच्या क्षणी राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट झाली.
प्रफुल्ल पटेल म्हणाले की, वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध का केला जात आहे हे मला समजत नाही. या विधेयकात असे काय आहे की ज्यामुळे त्याला विरोध केला जात आहे? आत्ताच अभिषेक मनु सिंघवी खूप बोलले आणि म्हणाले की, एक दिवस सर्वोच्च न्यायालय हा निर्णय रद्द करेल. पण आपण बनवलेले कायदे रद्द केले तर आपण न्यायालयाकडून कायदे बनवून घेतले पाहिजेत.
आपला पक्ष विधेयकाच्या बाजूने असला तरी मुस्लीम समाजाच्या विरोधात नाही. कारण महाराष्ट्रात राष्ट्रवादी हा एकमेव असा पक्ष आहे ज्याने मुस्लीम समाजातील एकाला विधान परिषदेवर आमदार केले आहे. विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादीनेच मुस्लीम समाजाला 10 टक्के तिकिटे दिली होती. एवढेच नाही तर मंत्रिमंडळात एकमेव मुस्लिम मंत्री हे राष्ट्रवादीच्या कोट्यातून आहेत.
जेव्हा जगातील अनेक मुस्लिम देश काळानुसार बदलले आहेत, मग आपल्या देशातील एका समुदायाला वेगळे करण्याचे आणि अपमानित करण्याचे प्रयत्न का केले जात आहेत? सबका साथ, सबका विकास हाच पंतप्रधान मोदींचा हेतू असल्याचेही पटेल यांनी सांगितले.
संविधानाची प्रत दाखवल्याबद्दल प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. सत्तेत जो कोणी बसतो तो राज्यघटनेच्या आधारे निवडणुका होऊन लोकांचा विश्वास जिंकूनच बसला आहे, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर दौऱ्यावर संघाच्या मुख्यालयासोबत दीक्षाभूमीलाही भेट दिल्याची आठवण करून दिली.
प्रफुल्ल पटेल आपले भाषण संपवणार होते, त्याचवेळी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत सभागृहात आले. त्यांच्याकडे बघत पटेल यांनी काँग्रेसला चिमटा काढला. "तुम्ही त्यांच्यापासून लांब रहा. ते अजूनही बदललेले नाहीत, आतून अजूनही ते तसेच आहेत", असा सल्ला काँग्रेसला दिला. बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करत ते म्हणाले, 1992 ला बाबरी माझ्या शिवसैनिकांनी पाडली होती असे त्यांचे नेते म्हणत होते. हे बरोबर आहे का संजय भैय्या?
मुंबईत मुस्लिमांवमरुद्ध दंगली झाल्या त्या कोणी केल्या होत्या याचा विचार करा. सत्ता हवी होती म्हणून तुम्ही त्यांच्याशी हातमिळवणी केली, तेव्हा तुम्हाला मुसलमान आठवले नाहीत का? अशी उपरोधिक विचारणा प्रफुल्ल पटेल यांनी केली. संजय राऊत सहसा खूप बोलतात पण आज ते सावधपणे बोलत होते. त्यांना काय बोलावे याबद्दल गोंधळ आहे का? असा त्यांच्या शांततेवर टोला लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.