supriya sule, narendra modi sarkarnama
देश

Supriya Sule On BJP : ''मी स्वतः घराणेशाहीचं प्रॉडक्ट, मला त्याचा सार्थ अभिमान; पण...''; खासदार सुळेंचा मोदी सरकारवर घणाघात

NCP Political News : '' तुमच्या बरोबर असलो तर मेरिट आणि आम्ही जर बरोबर असलो तर घराणेशाही असं कसं काय चालेल ? ''

सरकारनामा ब्यूरो

Delhi : भाजपकडून विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून काँग्रेससह विरोधीपक्षांवर टीकेचे घाव घालताना नेहमीच घराणेशाहीवर बोट ठेवले जाते. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरूवारी भाजपला घराणेशाहीच्या मुद्द्यांवरून चांगलेच कात्रीत पकडले. यावेळी त्यांनी भाजपा खासदारांची, आमदारांची पहिली, दुसरी आणि तिसरी पिढी राजकारणात झाली तरीही चालतं. मात्र, आम्ही केलं तर ती घराणेशाही असते असा घणाघात सुळे यांनी केला आहे.

लोकसभेत दिल्लीतल्या सेवा विधेयकावर गुरूवारी चर्चा होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळें(Supriya Sule) नी आपली भूमिका मांडली आणि सरकारवर निशाणा साधला. सुळे म्हणाल्या, भाजपाकडून कायमच आमच्यावर टीका करताना घराणेशाहीचा मुद्दा कायम पुढे केला जातो. मला ते मान्य आहे, कारण मी स्वतः घराणेशाहीचं प्रॉडक्ट आहेच. मी प्रतिभा शरद पवार यांची मुलगी आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे.

पण मला आज भाजप(bjp)ला प्रांजळ प्रश्न विचारायचा आहे. घराणेशाहीचा मुद्दा तुम्ही उपस्थित करता मग एनडीएची बैठक जेव्हा होते, तेव्हा जी. के. वासन, चिराग पासवान, प्रफुल पटेल, दुष्यंत चौटाला हे सगळे असतात. हे सगळे घराणेशाहीचं मेरिट सांगणारे नाहीत का? असा खडा सवाल करत भाजपला धारेवर धरले. तुमच्याबरोबर असलो तर मेरिट आणि आम्ही जर बरोबर असलो तर घराणेशाही असं कसं काय चालेल? असेही त्या म्हणाल्या.

या सगळ्याला मनमानी म्हणायचं नाहीतर काय?

जम्मू काश्मीर हे एक राष्ट्र होतं, त्याचं रुपांतर तुम्ही तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये केलं. त्यानंतर माननीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं होतं, एक वर्षात तिथे निवडणूक घेतली जाईल. आज चार वर्षे झाली आहेत तिथे निवडणूक घेण्यात आलेली नाही. या सगळ्याला मनमानी म्हणायचं नाहीतर काय? असा प्रश्न सुप्रिया सुळेंनी विचारला आहे.

...तर राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात सत्तेत कशी ?

भाजपा खासदारांची, आमदारांची पहिली, दुसरी आणि तिसरी पिढी राजकारणात झाली तरीही चालतं. मात्र, आम्ही केलं तर ती घराणेशाही असते. माझ्या मतदारसंघात येऊन भाजपाच्या दिग्गज नेत्यांनी काय म्हटलं होतं? NCP म्हणजे नॅचरली करप्ट पार्टी आहे. मला आता यांच्याकडून स्पष्टीकरण हवं आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात सत्तेत कशी काय? आम्ही तुमच्याबरोबर आलो तर आम्ही चांगले आणि विरोधात गेलो तर आम्ही वाईट असं नसतं. ही लोकशाही आहे, लोकशाहीत असं घडत नाही असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

हा नेमका कुठला न्याय ?

खासदार सुळे यांनी यावेळी दिल्लीच्या केजरीवाल सरकारमधील केंद्र सरकारच्या हस्तक्षेपावर देखील बोट ठेवले. दिल्लीच्या जनतेने अरविंद केजरीवाल(Arvind Kejariwal) यांना कौल दिला आहे. तिथे राज्यपाल ढवळाढवळ करत आहेत. तर दुसरीकडे केंद्र सरकार आम्हाला जनादेश मिळाला आहे म्हणून स्वतः गुणगान गातं आहे हा नेमका कुठला न्याय आहे. भाजपाकडून २०१४ आणि २०१९ मध्ये आम्हाला पूर्ण बहुमत मिळालं आहे आणि आम्ही विजयी झालो आहोत याचा डंका वाजवला जातो. मग अरविंद केजरीवाल यांना एक नियम आणि केंद्राला एक नियम हा कुठला न्याय आहे असा सवाल सुळेंनी लोकसभेत उपस्थित केला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT