NCPI Party News Sarkarnama
देश

NCPI News: विधानसभेत फक्त 822 मते; एका झटक्यात आता 20 खासदार! NCPIला राजकीय लॉटरी; पक्ष अचानक चर्चेत कसा आला?

NCPI History : तृणमूल काँग्रेसच्या २० बंडखोर खासदारांनी NCPI पक्षात विलीनीकरणाची घोषणा केली आहे. त्रिपुरात अवघी ८२२ मते मिळालेला आणि लोकसभा निवडणूक न लढवलेला पक्ष अचानक राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी कसा पोहोचला, जाणून घ्या.

Mangesh Mahale

पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाचे तब्बल २० लोकसभा खासदारांनी बंड केले आहे. ते 'नॅशनलिस्ट सिटिजन्स पार्टी ऑफ इंडिया' (NCPI) या छोट्या पक्षात सामील झाले आहेत. या घडामोडीनंतर आतापर्यंत फारशी ओळख नसलेला NCPI राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरला आहे.

बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन आपल्या गटाच्या विलीनीकरणाची अधिकृत माहिती दिली. खासदार काकोली घोष यांच्या नेतृत्वाखालील या गटाने लोकसभेत स्वतंत्र आसनव्यवस्थेची मागणीही केली आहे. विशेष म्हणजे, हा गट आता NDA सोबत काम करणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

या राजकीय घडामोडीतील सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे ज्या NCPI पक्षात हे खासदार गेले आहेत, त्या पक्षाने २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवलेलीच नव्हती. एवढेच नाही तर त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत या पक्षाला अवघी ८२२ मते मिळाली होती. तरीही एका झटक्यात २० खासदार मिळाल्याने पक्षाची ताकद प्रचंड वाढली आहे.

बंडखोर खासदारांचे म्हणणे आहे की, त्यांच्याकडे तृणमूल काँग्रेसच्या दोन-तृतीयांशपेक्षा जास्त खासदारांचे समर्थन असल्याने पक्षांतरबंदी कायदा लागू होणार नाही. सुदीप बंडोपाध्याय आणि शताब्दी रॉय यांसारख्या वरिष्ठ खासदारांनीही NCPI मध्ये विलीन झाल्याचे जाहीर केले आहे.

NCPI पक्षाची सुरुवात कशी झाली?

'नॅशनलिस्ट सिटिजन्स पार्टी ऑफ इंडिया' या पक्षाची स्थापना २० जानेवारी २०२३ रोजी झाली. हा पक्ष निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत असला तरी त्याला अद्याप मान्यताप्राप्त पक्षाचा दर्जा मिळालेला नाही. आयोगाच्या नोंदीनुसार पक्षाचे निवडणूक चिन्ह 'पेनची निब' आहे.

त्रिपुरात पहिले पाऊल, पण अपयश

NCPI ने आपला पहिला राजकीय प्रयोग त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत केला होता. आदिवासी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व देण्याच्या उद्देशाने सात जागांवर उमेदवार देण्याचा प्रयत्न झाला. मात्र छाननीदरम्यान चार अर्ज बाद झाले.

अखेरीस दोन जागांवर निवडणूक लढवण्यात आली. छवामनू मतदारसंघात ५३६ तर कैलाशहरमध्ये २८६ मते मिळाली. म्हणजे पक्षाच्या चिन्हावर लढलेल्या उमेदवारांना मिळालेली एकूण मते केवळ ८२२ होती. निवडणुकीनंतर पक्ष जवळपास निष्क्रिय झाला होता.

पक्षाचे नेतृत्व कोणाकडे?

निवडणूक आयोगाच्या कागदपत्रांनुसार, पक्षाला एकूण १.१३ लाख रुपयांच्या देणग्या मिळाल्या होत्या. शेली कुंडू या पक्षाच्या प्रमुख नेत्या असून त्यांचे नाव पक्षाच्या कागदपत्रांमध्ये कोषाध्यक्ष म्हणून नमूद आहे. त्या काही व्यावसायिक आणि सामाजिक संस्थांशीही संबंधित आहेत.

भाजप कनेक्शनची चर्चा का?

NCPI चा नोंदणीकृत पत्ता हावडा जिल्ह्यात आहे. शेली कुंडू यांचे पती उत्तिया कुंडू यांनी भाजप नेते शुभेंदु अधिकारी यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने या संपूर्ण राजकीय घडामोडींमध्ये भाजपची भूमिका असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र याबाबत अधिकृतपणे कोणतीही पुष्टी झालेली नाही.

अचानक राष्ट्रीय चर्चेत

पक्षाचे नेते शांतनू डे यांच्या मते, निधीअभावी आणि अंतर्गत मतभेदांमुळे NCPI चे कामकाज बराच काळ मर्यादित राहिले होते. २०२६ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करण्याचा विचार होता. मात्र त्याआधीच तृणमूल काँग्रेसमधील मोठ्या फुटीमुळे NCPI ला एका झटक्यात २० खासदार मिळाले आणि पक्ष थेट राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी पोहोचला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT