Lok Sabha News: लोकसभा निवडणुकीला अद्याप तीन वर्षांचा कालावधी बाकी असला, तरी भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) आतापासूनच आपले राजकीय समीकरण मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दलाने पुन्हा एनडीएला साथ देण्याचा निर्णय घेतल्याने आघाडीच्या विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे.
यापूर्वी विविध टप्प्यांवर शिवसेना, जनता दल युनायटेड (जेडीयू) आणि तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) यांसारखे पक्ष एनडीएच्या गोटात दाखल झाले. या पक्षांच्या पाठिंब्यामुळे लोकसभेतील एनडीएच्या संख्याबळात ४२ खासदारांची भर पडली आहे.
एनडीएतून बाहेर पडलेल्या पक्षांना पुन्हा सोबत आणण्यात भाजपला यश आले आहे. २०१८ मध्ये तेलुगू देसम पार्टीने आघाडीची साथ सोडली. त्यानंतर २०१९ मध्ये शिवसेना आणि २०२० मध्ये शिरोमणी अकाली दल एनडीएपासून वेगळे झाले.
दुसरीकडे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडीयूनेही अनेकदा राजकीय भूमिका बदलल्या. २०२४ मध्ये जेडीयू आणि टीडीपी पुन्हा एनडीएच्या बाजूने उभे राहिले. आसाम गण परिषद आणि एआयएडीएमकेसारख्या पक्षांनीही वेगवेगळ्या राजकीय घडामोडींनंतर एनडीएशी जवळीक साधली.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला २४० जागा मिळाल्या होत्या. २०१४ आणि २०१९ प्रमाणे स्वबळावर बहुमत मिळवण्यात पक्षाला यश आले नाही. त्यामुळे केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी मित्रपक्षांचा पाठिंबा निर्णायक ठरला. टीडीपीचे १६ आणि जेडीयूचे १२ खासदार यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचाही भाजपला पाठिंबा आहे.
शिवसेनेच्या खासदारांच्या संख्येतही पुढील काळात बदल झाला. २०२४ च्या निवडणुकीत पक्षाने सात जागा जिंकल्या होत्या. जून २०२६ मध्ये आणखी सहा खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने पक्षाचे संख्याबळ १३ वर पोहोचले. यामध्ये संजय दीना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वाकचूरे, नागेश पाटील आणि ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचा समावेश आहे.
जेडीयूचा एनडीएसोबतचा प्रवासही चढ-उतारांचा राहिला आहे. २०१३ मध्ये पक्षाने एनडीएपासून फारकत घेतली. २०१७ मध्ये पुन्हा आघाडीत प्रवेश केला; मात्र २०२२ मध्ये पुन्हा बाहेर पडला. जानेवारी २०२४ मध्ये नितीश कुमार यांनी एनडीएमध्ये पुनरागमन केले. त्यावेळी त्यांनी पुन्हा आघाडी सोडण्याचा प्रश्नच नसल्याचे म्हटले होते.
पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल आणि भाजप यांच्यातील राजकीय जवळीक पुन्हा वाढली आहे. २०२० मध्ये तीन कृषी कायद्यांवरून निर्माण झालेल्या मतभेदांनंतर अकाली दलाने एनडीए सोडली होती. एप्रिलमध्ये घटनादुरुस्ती विधेयकालाही पक्षाने पाठिंबा दिला नव्हता. मात्र, आता पंजाब विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याची घोषणा अमित शाह यांनी केली आहे. त्यामुळे केंद्रातील एनडीएच्या राजकीय समीकरणांना पंजाबमधूनही नवे बळ मिळण्याची चिन्हे आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.