NCP Merger: शरद पवारांचा भाजपला विरोध, अजितदादांचा मोदींच्या नेतृत्वाला पाठिंबा होता; प्रकाश सोळंकेंनी सांगितलं विलीनीकरणाचं वास्तव!

Prakash Solanke on NCP Merger: भाजपसोबत जाण्यावर शरद पवार आणि अजितदादांची भूमिका वेगळी होती. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर आमदार प्रकाश सोळंके यांनी स्पष्ट मत मांडले.
Prakash Solanke on NCP Merger
Prakash Solanke on NCP MergerSarkarnama
Published on: 
Updated on: 

Beed News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असली, तरी प्रत्यक्षात दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार प्रकाश सोळंके यांनी व्यक्त केले आहे.

भाजपसोबत जाण्याच्या मुद्द्यावर शरद पवार आणि दिवंगत अजित पवार यांच्या भूमिका वेगवेगळ्या होत्या. हाच दोन्ही नेत्यांमधील मतभेदाचा प्रमुख मुद्दा असल्याचे सांगत सोळंके यांनी विलीनीकरणाच्या चर्चेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट आणि त्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र, अजितदादांच्या निधनानंतर विलीनीकरणाचा विषय पुढे येणे दुर्दैवी असल्याची खंतही प्रकाश सोळंके यांनी व्यक्त केली. त्यांच्या मते, या चर्चेतून काही ठोस निष्पन्न होण्याची शक्यता कमी आहे.

भाजपसोबत जाण्यावर दोन्ही नेत्यांची वेगवेगळी भूमिका

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्यामागील राजकीय मतभेदांचा संदर्भ देताना सोळंके यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्या भूमिकेतील फरक स्पष्ट केला. भाजपसोबत युती करण्यास शरद पवार यांचा विरोध होता. दुसरीकडे, राज्याच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये सहभागी व्हायला हवे, अशी अजितदादांची भूमिका होती.

Prakash Solanke on NCP Merger
Maharashtra Cabinet Decisions: खासगी शाळांसाठी नवा कायदा, वसतिगृह भत्ता वाढणार; शिक्षण क्षेत्रासाठी 5 मोठे निर्णय

याच मुद्द्यावर दोन्ही नेत्यांमध्ये मतभिन्नता निर्माण झाली होती. भाजपसोबत जाण्याबाबत असलेल्या या वेगवेगळ्या विचारांमुळेच अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून वेगळी भूमिका घेतल्याचे सोळंके यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता दोन्ही गटांचे विलीनीकरण होणे व्यवहार्य वाटत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Prakash Solanke on NCP Merger
Devendra Fadnavis: यशवंतरावांच्या पुण्यतिथीला फडणवीस गैरहजर; सलग दुसऱ्या वर्षी प्रीतिसंगमाकडे पाठ, कऱ्हाडमध्ये नेमकं काय घडलं?

'शिळ्या कढीला ऊत आणण्यासारखे'

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र, यापूर्वीही विलीनीकरणाबाबत चर्चा झालेली असताना त्यातून काही ठोस मार्ग निघालेला नाही, असे सोळंके यांच्या वक्तव्याचा सूर आहे. अजितदादांच्या अंत्यविधीपूर्वीच या विषयाची चर्चा सुरू झाली होती, असेही त्यांनी नमूद केले.

विलीनीकरण प्रत्यक्षात शक्य वाटत नसल्याने वारंवार त्याच विषयावर चर्चा करण्यात अर्थ नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. 'विलीनीकरणाची चर्चा म्हणजे शिळ्या कढीला ऊत आणण्यासारखे आहे,' अशा शब्दांत प्रकाश सोळंके यांनी या चर्चेवर प्रतिक्रिया दिली. त्यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाबाबत पुन्हा राजकीय चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.