PM Narendra Modi Nitish Kumar Chirag Paswan Sarkarnama
देश

NDA Meeting : नितीश कुमार मोदींचे पाय धरू लागले अन् चिराग गळ्यात पडले! काय घडलं 'एनडीए'च्या बैठकीत?

Rajanand More

New Delhi : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. शुक्रवारी जुन्या संसदेतील सेंट्रल हॉलमध्ये एनडीएच्या संसदीय दलाची बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची संसदीय दलाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी मोदींच्या नावाला पाठिंबा दिला.

नितीश कुमार यांनी यावेळी बोलताना शेवटपर्यंत सरकारसोबत राहणार असल्याचे सांगत मोदींना आश्वस्त केले. भाषण संपल्यानंतर ते मोदींच्या दिशेने गेले आणि थेट त्यांचे पाय धरू लागले.

पण मोदींनी त्यांना रोखून हातात हात घेत त्यांचा मान राखला. मोदी आणि नितीश कुमारांच्या वयात जेमतेम सहा महिन्यांचे अंतर आहे. त्यामुळे नितीश कुमारांच्या या कृतीने सगळ्यांचीच मनं जिंकली.

चिराग पासवान यांनी आपल्या भाषणात त्यांचे वडील रामविलास पासवान यांची आठवण काढली. नरेंद्र मोदींवर कौतुकाचा वर्षाव करत त्यांनाही अखेरपर्यंत एनडीएसोबत राहणार असल्याचे सांगितले. त्यानंतर मोदींजवळ जात चिराग त्यांच्या गळ्यात पडले. मोदींनीही त्यांना आपुलकीने जवळ घेतले.

दरम्यान, आपल्या भाषणात नितीश कुमारांनी एनडीएला सरकारला दिलासा देताना इंडिया आघाडीवर टीका केली. ते म्हणाले, आता जे निवडून आले आहेत, ते पुढच्या वेळी निवडून येणार नाहीत. मोदींनी दहा वर्ष देशाची सेवा केली. त्यांनी काहीच केले नाही. आता जे काम बाकी आहे, ते मोदी पूर्ण करतील. आम्ही शेवटपर्यंत त्यांच्यासोबत आहोत, असे नितीश यांनी स्पष्ट केले.

काय म्हणाले मोदी?     

पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात एनडीएचे जोरदार कौतुक केले. सुशासनमध्ये एनडीए असल्याचे सांगत त्यांनी तिसऱ्या टर्ममध्ये देशाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कोणतीही कसर सोडणार असल्याचे आश्वासन जनतेला दिले. यावेळी त्यांनी काँगेसवरही शरसंधान साधले.

चार जूननंतर ईव्हीएमची प्रेतयात्रा काढली जाईल, असे वाटले होते. पण तसे काहीच झाली नाही. ईव्हीएम जिवंत आहे का मेलं, असा खोचक सवालही मोदींनी केला. रिबांचे कल्याण हे आमच्या साठी महत्वाचे असून गेल्या 10 वर्षात गरिबांचे सरकार काय असते हे जनतेने अनुभवले आहे. पुढील 10 वर्षात हे एनडीए सरकार देशाचा विकास, आणि नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे मोदी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT