Rahul Gandhi on NEET leak Sarkarnama
देश

Rahul Gandhi on NEET leak : ‘NEET’ची मुख्यच नव्हे, तर राखीव प्रश्नपत्रिकाही फुटली? शिक्षणमंत्री अजून पदावर का? राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

CBI intensifies NEET 2026 paper leak investigation questions arise over NTA officials role, while Rahul Gandhi targets Narendra Modi government over repeated exam leaks : CBI तपासात राखीव प्रश्नपत्रिकाही फुटल्याचा धक्कादायक खुलासा झाल्याने NTA अधिकाऱ्यांवर संशय वाढला असून परीक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

Pradeep Pendhare

NEET 2026 Paper Leak : ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला आता मोठे वळण मिळाले असून, केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाचा वेग वाढवला आहे. या प्रकरणाची व्याप्ती राष्ट्रीय परीक्षा संस्थेपर्यंत (NTA) पोहोचल्याचे संकेत मिळत असून, संस्थेतील काही अधिकारीही तपास यंत्रणांच्या रडारवर आल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना वारंवार होणाऱ्या प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांनंतरही पदावरून का हटवले जात नाही, असा थेट सवाल राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी रविवारी ‘एक्स’वरून उपस्थित केला. तसेच, या गंभीर प्रकरणावर पंतप्रधान मोदी सतत मौन का बाळगून आहेत, यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

“NEET 2024 मध्ये प्रश्नपत्रिका फुटली, परीक्षा रद्द झाली नाही, मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही. CBI चौकशी झाली, समिती स्थापन झाली. आता NEET 2026 मध्ये पुन्हा प्रश्नपत्रिका फुटली, परीक्षा रद्द झाली, CBI चौकशी सुरू आहे आणि पुन्हा समिती स्थापन केली जाणार,” असे राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

यासोबतच त्यांनी, “मोदीजी, देश तुम्हाला काही प्रश्न विचारत आहे. प्रश्नपत्रिका वारंवार का फुटत आहेत? ‘परीक्षा पे चर्चा’वर तुम्ही पुन्हा पुन्हा शांत का राहता? आणि सतत अपयशी ठरणाऱ्या शिक्षणमंत्र्यांना का हटवत नाही?” असा थेट सवालही केला.

दरम्यान, ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. CBI च्या प्राथमिक तपासात ‘नीट’चा केवळ मुख्य प्रश्नपत्रिका संचच नव्हे, तर राखीव ठेवण्यात आलेला दुसरा संचही फुटल्याचे समोर आले आहे. तपासादरम्यान, राखीव संचातील प्रश्नदेखील कथित ‘गेस पेपर’मधील प्रश्नांशी हुबेहूब जुळत असल्याचे आढळून आले आहे.

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार म्हणून सहाय्यक प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी, प्राध्यापिका मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे यांची नावे पुढे आली आहेत. या तिघांभोवती तपासाचा फास अधिक घट्ट होत असल्याचे सांगितले जात आहे.

दरवर्षी राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) कडून ‘NEET-UG’ परीक्षेसाठी दोन स्वतंत्र प्रश्नपत्रिका संच तयार केले जातात. यापैकी एक संच मुख्य परीक्षेसाठी वापरला जातो, तर दुसरा संच आकस्मिक परिस्थितीसाठी राखीव ठेवला जातो. कोणता संच अंतिमतः वापरला जाणार, याची माहिती अत्यंत गोपनीय ठेवली जाते आणि ती केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांपुरती मर्यादित असते. मात्र, आता राखीव संचातील प्रश्नही आधीच बाहेर पडल्याचा संशय व्यक्त होत असल्याने, या प्रकरणाने देशातील परीक्षा व्यवस्थेच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT