NEET paper leak case : ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पुण्यातील प्राध्यापिका मनीषा मांढरे हिला दिल्लीतील विशेष न्यायालयाने 14 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत असून, राष्ट्रीय परीक्षा संस्थेतील (NTA) एका अधिकाऱ्याचाही तपास यंत्रणांच्या रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे. “प्रश्नपत्रिका संघटित पद्धतीने फोडण्यात आली असून, या कटातील प्रत्येक दुव्यापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे,” असे सरकारी पक्षाने न्यायालयात स्पष्ट केले.
सीबीआयने ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील (Pune) वनस्पतिशास्त्राच्या प्राध्यापिका मनीषा मांढरेला अटक केली असून, आतापर्यंत या प्रकरणात आठ जणांना अटक करण्यात आली आहे. आणखी काही संशयितांचा शोध सुरू असल्याचे तपास यंत्रणांनी सांगितले. मनीषा मांढरे यांची ‘एनटीए’ने विषयतज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली होती. तिला वनस्पतिशास्त्र आणि प्राणिशास्त्र विषयांच्या प्रश्नपत्रिकेची माहिती उपलब्ध होती. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, तिने काही विद्यार्थ्यांना प्रश्न सांगून त्यांच्याकडून उत्तरे लिहून घेतल्याचा आरोप आहे.
मनीषा मांढरेला न्यायालयात रविवारी हजर करण्यात आले असता, तिच्या वकिलांनी सीबीआयची (CBI) अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत कोठडीला विरोध केला. मात्र, न्यायालयाने प्राथमिक पुरावे आणि गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत सीबीआयचा युक्तिवाद मान्य केला. विशेष न्यायाधीश कोलेट रश्मी कुजूर यांनी, “गुन्ह्याचे स्वरूप आणि तपासाची गरज लक्षात घेता आरोपीला 14 दिवसांची सीबीआय कोठडी देण्यात येत आहे. तिला 30 मे 2026 रोजी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात यावे,” असा आदेश दिला.
दरम्यान, ‘एनटीए’मधील काही अधिकाऱ्यांच्या भूमिकेचाही तपास सुरू असून, पेपरफुटीला संस्थेच्या आतून मदत मिळाल्याचा संशय सीबीआयने व्यक्त केला आहे. या संपूर्ण प्रकरणामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता तपास यंत्रणा पडताळत आहेत.
सीबीआयकडून आता टेलिग्रामवरील संभाषणे, पैशांचे व्यवहार आणि परीक्षा प्रक्रियेशी संबंधित दुव्यांची सखोल चौकशी केली जात आहे. प्रश्नपत्रिकेतील प्रश्न विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच दलाल, विद्यार्थी आणि इतर आरोपींशी संपर्क साधण्यासाठी टेलिग्रामचा वापर झाल्याचे तपासात समोर आले आहे.
तपास यंत्रणांच्या मते, मनीषा मांढरे ही या प्रकरणातील महत्त्वाची कडी आहे. तिला प्रश्नपत्रिकेतील वनस्पतिशास्त्र आणि प्राणिशास्त्र विषयांच्या प्रश्नांचे भाषांतर करण्याचे अधिकार होते. तसेच प्रश्नपत्रिकेची गोपनीय माहिती पाहण्याची मुभाही तिला होती. सीबीआयच्या मते, तिने पी. व्ही. कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे यांच्या मदतीने प्रश्नपत्रिका लीक केली. त्यानंतर हे प्रश्न नाशिकमधील शुभम खैरनारपर्यंत पोहोचवण्यात आल्याचा दावा न्यायालयात करण्यात आला.
तपासात पुढे असेही समोर आले की, मनीषा मांढरेच्या माध्यमातूनच मनीषा वाघमारे आणि पी. व्ही. कुलकर्णी यांचा संपर्क झाला होता. वाघमारेने कुलकर्णीकडून प्रश्न घेतल्यानंतर ते धनंजय लोखंडे आणि इतर आरोपींपर्यंत पोहोचवले. कुलकर्णीने हाताने लिहून दिलेले प्रश्न परीक्षेनंतर नष्ट करण्यात आल्याची माहितीही तपासात पुढे आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.