NEET Paper Leak Case sarkarnama
देश

NEET Paper Leak: दिव्याखाली अंधार! NEET चा पेपर NTA ऑफिसमधूनच फुटला?

NEET Paper Leak From NTA: NEET परीक्षा पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रश्नपत्रिका थेट NTA कार्यालयातूनच फुटल्याचा संशय व्यक्त होत असून तपास यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत.

Mangesh Mahale

NEET 2026 News: नीटचा पेपर कसा फुटला, नाशिक, पुणे, अहिल्यानंतर, लातूर, ठाणे कनेकशन समोर येत असतानाच धक्कादायत माहिती समोर येत आहे. नीटचा पेपर नाशिक किंवा अन्य दुसरीकडे फुटला नसून तो चक्क नीट परीक्षा घेण्याऱ्या एनटीएच्या ऑफिसमधूनच फुटला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तपास यंत्रणा आता या दिशेने तपासाची सुत्रं फिरवली आहे. याबाबतची माहिती एका मराठी वृत्त वाहिनीने दिली आहे.

देशातील सर्वात मोठ्या वैद्यकीय प्रवेश परीक्षांपैकी एक असलेल्या NEET परीक्षेबाबत पुन्हा एकदा पेपरफुटीच्या आरोपांमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा दावा करण्यात आल्यानंतर लाखो विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक राज्यांमध्ये संशयितांवर कारवाई करण्यात आली असून, तपास यंत्रणांनी या प्रकरणाचा मोठा रॅकेट म्हणून तपास सुरू केला आहे.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, काही ठिकाणी उमेदवारांकडून मोठी रक्कम घेऊन प्रश्नपत्रिका पुरवल्याचा आरोप आहे. बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि गुजरातसह अनेक राज्यांमध्ये पोलिसांनी छापेमारी करून काही आरोपींना ताब्यात घेतले आहे. काही संशयितांकडून मोबाईल फोन, लॅपटॉप आणि दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत.

या प्रकरणामुळे NEET परीक्षेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. अनेक विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, वर्षभर मेहनत घेऊन अभ्यास करणाऱ्यांवर अन्याय होत असून, पेपरफुटीमुळे गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

दरम्यान, केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. पेपरफुटीच्या आरोपांची चौकशी सुरू असल्याचे सांगत दोषींवर कठोर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. काही प्रकरणांमध्ये CBI चौकशीचीही मागणी जोर धरत आहे.

गेल्या काही वर्षांत देशभरात विविध स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियांमध्ये पेपरफुटीच्या घटना सातत्याने समोर आल्या आहेत. त्यामुळे परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होत असल्याची भावना विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे. NEET प्रकरणामुळे पुन्हा एकदा परीक्षा सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या संपूर्ण प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली असून, पेपरफुटीमागे संघटित रॅकेट कार्यरत असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.

SCROLL FOR NEXT