Maharashtra school education Sarkarnama
देश

Text Book: शाळांसाठी नव्या सूचना! आता ‘या’ विषयांची पाठ्यपुस्तके वापरणे शिक्षकांना बंधनकारक; शिक्षक संचालकांचे आदेश

Text Book: राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने राज्यातील शालेय अभ्यासक्रमात करण्यात आलेल्या बदलांची अंमलबजावणी आता अधिक काटेकोरपणे केली जाणार आहे.

Sudesh Mitkar

Text Book: राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने राज्यातील शालेय अभ्यासक्रमात करण्यात आलेल्या बदलांची अंमलबजावणी आता अधिक काटेकोरपणे केली जाणार आहे. इयत्ता तिसरी, चौथी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शारीरिक शिक्षण व निरामयता, कार्यशिक्षण, कलाशिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण या विषयांची नव्याने प्रकाशित करण्यात आलेली पाठ्यपुस्तके आता शाळांमध्ये वापरणे अनिवार्य करण्यात आली आहेत.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार तयार करण्यात आलेल्या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याअंतर्गत इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित करण्यात आली आहेत. यातील तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी शारीरिक शिक्षण व निरामयता, कार्यशिक्षण आणि कलाशिक्षण, तर सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शारीरिक शिक्षण व निरामयता, व्यावसायिक शिक्षण आणि कलाशिक्षण या विषयांची पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांना या पाठ्यपुस्तकांचा नियमित वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळं संबंधित विषय केवळ तासिका पूर्ण करण्यापुरत्या न शिकवता नियोजित वेळापत्रकानुसार संबंधित पाठ्यपुस्तकांच्या आधारे अध्यापन करणे शिक्षकांना बंधनकारक राहणार आहे.

आठवड्याचे वेळापत्रकही निश्चित

शारीरिक शिक्षण व निरामयता, कार्यशिक्षण, कलाशिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण या विषयांसाठी आठवडानिहाय तासिका आणि वेळापत्रक यापूर्वीच निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे या विषयांची पुस्तके उपलब्ध करून देणे एवढ्यावरच जबाबदारी संपणार नसून, निश्चित वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना या विषयांचे अध्यापन करणे अपेक्षित आहे.

राज्यातील मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी संबंधित पाठ्यपुस्तके महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच गुजराती, कन्नड, सिंधी, तेलुगू, तमिळ आणि बंगाली माध्यमांसाठी संबंधित पाठ्यपुस्तके ‘ई-बालभारती’च्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे.

या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित शाळा आणि शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे शारीरिक शिक्षण, कला, कार्यशिक्षण आणि व्यावसायिक शिक्षणाच्या तासिकांकडे दुर्लक्ष करणाऱ्या शाळांना लगाम बसण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT