Nilesh Lankhe News  Sarkarnama
देश

Nilesh Lanke News : 'जनतेच्या मनातील खासदार' नीलेश लंके धर्मसंकटात; लोकसभेसाठी 'साहेबांचा हात' की निधीसाठी 'दादांची साथ'?

Ahmednagar Politics : "दोन-अडीच वर्षांपासून सुरू केलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तयारी.."

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar Latest News : एक साधा शिवसैनिक ते शिवसेना तालुका प्रमुख आणि पुढे थेट पारनेर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार अशी राजकीय ओळख असलेले आमदार नीलेश लंके सध्या 'राजकीय पेचात' आलेत का, यावर चर्चा सुरू झाली आहे आणि याला कारण म्हणजे त्यांनी दोन-अडीच वर्षांपासून सुरू केलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी अन् राष्ट्रवादीत निर्माण झालेले शरद पवार आणि अजित पवार गट, यात आता निर्णायक क्षणी घ्यावी लागणारी भूमिका असणार आहे. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार लंके हे अगदी सामान्य कुटुंबातून समाजकारणात आणि राजकारणात पुढे आलेले आणि राज्यात चर्चेत असलेले नाव आहे. शिवसेना सोडली असली तरी हातावर आजही शिवबंधनाचा धागा ही जशी लंकेची ओळख आहे, तशीच पवार कुटुंबातील पवारसाहेब, खासदार सुप्रियाताई आणि अजितदादा या सर्वांचे लाडके, असे ते राहिले आहेत. कोरोना काळात 'शरदचंद्र पवार आरोग्य केंद्र' या माध्यमातून त्यांनी केलेले कामाची देशभरात चर्चा झाली. त्यामुळेच खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्येक व्यासपीठावरून त्यांचे तोंडभरून कौतुक केलेले आहे.

2019 विधानसभा निवडणुकीला अजितदादांनी नीलेश लंके यांच्यातील 'नेता' ओळखून त्यांना उमेदवारी दिली. त्यात पक्षाचे निष्ठावंत सुजित झावरे यांना डावलले. तत्कालीन विधानसभा उपाध्यक्ष आणि तीन वेळा शिवसेना आमदार राहिलेले विजय औटी यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करत लंके विजयी झाले. त्यामुळे एकूणच संपूर्ण पवार कुटुंब राजकीय जीवनात पाठीशी राहिल्याने आमदार लंके यांना येणारी लोकसभा निवडणूक लढवायची असेल, तर 'फायनल' निर्णय घ्यावा लागणार आहे.

अजितदादांच्या राष्ट्रवादीतील बंडानंतर आमदार लंके अजितदादांसोबत गेले. आई की बाप? अशी आपण निवड करू शकत नाहीत कारण दोन्हीही महत्त्वाचे असतात, असे सांगत लंके यांनी मतदारसंघातील कामांना निधी मिळाला पाहिजे, असे सांगत अजितदादांची सोबत केली. दादांनीच मला 2019 ला विधानसभेला तिकीट दिले आणि मी आमदार झालो, याची कबुलीही लंकेनी दिली.

आता मात्र 2024 लोकसभेसाठी निवडणूक लढवण्याच्या तयारीत आमदार लंके असताना यांनी दसऱ्यापूर्वी शरद पवार गटात आल्यास त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, असे संकेत शरद पवार गटाकडून मिळत आहेत. दोन दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत शरद पवार यांच्यासमोर हा विषय झाला असल्याची माहिती आहे. त्यामुळे आमदार लंके यांना आता लोकसभा निवडणुकीबाबत उघड भूमिका घेण्याची वेळ आल्याचे बोलले जात आहे.

आमदार लंके आजमितीला अजित पवार गटासोबत महायुतीत आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीत उतरण्यासाठी त्यांना शरद पवार गटासोबत येणे गरजेचे असणार आहे. महायुतीत विद्यमान भाजप खासदार सुजय विखे असताना उमेदवारी मिळणे अवघड असणार आहे. अशात 'जनतेच्या मनातील खासदार' अशी ओळख निर्माण करणाऱ्या आमदार नीलेश लंकेंना आपला निर्णय घ्यावा लागेल, असे बोलले जात आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT