NITI Aayog Report on Education and Unemployment: देशातील शिक्षण व्यवस्था आणि रोजगाराच्या संधी यांच्यातील मोठी दरी पुन्हा एकदा समोर आली आहे. पदवीचे शिक्षण पूर्ण करूनही अनेक तरुणांना त्यांच्या शिक्षणाशी संबंधित नोकरी मिळत नसल्याची धक्कादायक माहिती नीती आयोगाच्या अहवालातून समोर आली आहे. ‘Reimagining Skilling for Vibrant India’ या अहवालात शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगार यांच्यातील सध्याची परिस्थिती अधोरेखित करण्यात आली आहे.
अहवालानुसार, देशात दरवर्षी पदवी शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांपैकी केवळ 8.25 टक्के तरुणांनाच त्यांच्या शिक्षण क्षेत्राशी सुसंगत आणि योग्य नोकरी मिळते. म्हणजेच 100 पदवीधरांपैकी जवळपास 92 जणांना त्यांच्या शिक्षणाच्या शाखेशी संबंधित रोजगार मिळत नाही. त्यामुळे पदवी मिळवल्यानंतरही तरुणांसमोर रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचे या आकडेवारीतून दिसून येते.
नीती आयोगाच्या अहवालाने भारतीय शिक्षण व्यवस्थेतील एक महत्त्वाची समस्या लक्षात आणून दिली की पारंपरिक अभ्यासक्रम आणि सध्याच्या उद्योग क्षेत्राच्या गरजा यांच्यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे. महाविद्यालयांमध्ये शिकवले जाणारे विषय आणि प्रत्यक्ष नोकरीच्या बाजारपेठेत आवश्यक असणारी कौशल्ये यांचा योग्य मेळ बसत नसल्याने पदवीधर तरुणांना नोकरी मिळवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण केल्यानंतर कोणत्या क्षेत्रात करिअर करावे, उद्योग क्षेत्राला कोणती कौशल्ये आवश्यक आहेत आणि स्वतःच्या कौशल्यांमध्ये कोणते बदल करावेत, याबाबत योग्य मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून रोजगारासाठी आवश्यक असलेली व्यावहारिक कौशल्ये आत्मसात करणेही तितकेच महत्त्वाचे ठरत आहे.
शिक्षणानुसार खासगी क्षेत्रात नोकरीच्या संधी मर्यादित असल्याने सरकारी नोकरीकडे तरुणांचा मोठ्या प्रमाणावर कल वाढत आहे. परिणामी सरकारी भरतीमधील प्रत्येक पदासाठी स्पर्धा प्रचंड वाढली आहे. पदवीधरांची संख्या मोठी असताना त्यांच्या शिक्षणाशी जुळणाऱ्या नोकऱ्या कमी असणे ही रोजगार व्यवस्थेसमोरील मोठी समस्या बनली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.