

Rahul Gandhi campaign : नीट पेपरफुटीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी 'छात्रों की गुंज' ही मोहीम हाती घेतली आहे. नुकत्याच पुण्यात झालेल्या कार्यक्रमाला विद्यार्थिनींचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. जंतरमंतरवरील आंदोलनानंतर तर सत्ताधारी भाजपसह सर्व राजकीय पक्षांचे नेते विद्यार्थी आणि जेन झीला आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियातही सक्रीय झाले आहेत.
सोशल मीडियात आणि प्रामुख्याने इन्स्टाग्रामला तरुणाईची सर्वाधिक पसंती असते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दिल्लीतील आंदोलनानंतर काही रील्स पोस्ट केल्या होत्या. त्याचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. या रील्स भाजपसह मित्रपक्षातील अनेक नेते, मंत्र्यांनीही रिपोस्ट केल्या. त्यावर लाईक्सचा पाऊस पडला होता. पण राहुल गांधींना आपल्या पक्षातील नेत्यांकडून तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे राहुल गांधी यांच्या भगिनी खासदार प्रियांका गांधी यांचाही या नेत्यांच्या यादीत समावेश आहे. केवळ पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्यांच्या सोशल मीडियातील पोस्ट पाहिल्यानंतर हे वास्तव समोर आले आहे. राहुल गांधी यांच्या पुण्यातील छात्रों की गुंज कार्यक्रमाच्या प्रचार-प्रसिध्दीकडे अनेक नेत्यांनी पाठ फिरविली आहे. प्रियांका गांधी यांनी या कार्यक्रमाची लिंक फेसबुक आणि ट्विटरवर पोस्ट केली आहे. पण याबाबत इन्स्टाग्रामवर एकही पोस्ट नाही.
पक्षाचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनीही केवळ फेसबुकवर लिंक टाकली आहे. इन्स्टा आणि एक्सवर एकही पोस्ट नाही. यंग ब्रिगेडमधील खासदार प्रणिती शिंदे कार्यक्रमादरम्यान गाण्यावर ताल धरताना दिसल्या होत्या. पण त्याही केवळ इन्स्टाग्रामवर सक्रीय आहेत. एक्स आणि फेसबुकवर त्यांची याबाबत एकही पोस्ट नाही. या यादीमध्ये अनेक मातब्बर नेत्यांची नावे आहेत. हे नेते सोशल मीडियात आपल्याच नेत्याबाबत उदासीन असल्याचे धक्कादायक चित्र आहे.
दिग्विजय सिंह, जयराम रमेश, अलका लांबा, भूपेश बघेल, अजय माकन, अधीर रंजन चौधरी, अभिषेक मनु सिंघवी, पी चिदंबरम, रजनी पाटील, कन्हैय्या कुमार, चरणजीत सिंग चन्नी, मिनाक्षी नटराजन, प्रतिभा सिंह, रमेश चेन्निथला, शशी थरूर, सिध्दरामय्या, मनिष तिवारी यांसह राष्ट्रीय कार्यकारिणीतील अनेक नेते राहुल गांधी यांच्या छात्रों की गुंज कार्यक्रमाबाबत सोशल मीडियात पोस्ट करण्यास उत्सुक नसल्याचे समोर आले आहे.
या यादीतील काही नेत्यांनी केवळ एक्सवर, तर काही नेत्यांनी केवळ फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. काही नेत्यांनी तिन्हीही ठिकाणी एकही पोस्ट केलेली नाही. एकीकडे या नेत्यांकडून आपल्या भाषणांमध्ये राहुल गांधी यांना पंतप्रधान करायचे आहे, अशा आणाभाका घेतल्या जातात. त्यांचे कौतुक केले जाते. पण हेच नेते आपल्या नेत्याचे सोशल मीडियात प्रमोशन करताना दिसत नाहीत.
केवळ 'जेन झी'च नव्हे तर आता देशातील कोट्यवधी लोक सोशल मीडियात सक्रीय आहेत. राजकारणासह विविध घडामोडींवर सोशल मीडियात आपले मत व्यक्त करतात. सोशल मीडियात सुरू असलेल्या चर्चांमध्ये सहभागी होऊन त्यावर प्रतिक्रिया देतात. व्हिडिओ, फोटोच्या माध्यमातून आजूबाजूचे वास्तव जगासमोर मांडतात. कॉक्रोच जनता पार्टीची सुरुवात तर सोशल मीडियातूनच झाली होती. त्याची जगभरात दखल घेतली गेली. पण काँग्रेसचे अनेक नेते अजूनही धडा घ्यायला तयार नाहीत, असे दिसते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.