Nitish Kumar, Chandrababu Naidu
Nitish Kumar, Chandrababu Naidu Sarkarnama
देश

NDA Politics : नितीशकुमार अन् चंद्राबाबू 'या' मागणीसाठी पंतप्रधान मोदींची डोकेदुखी वाढवणार..?

Sunil Balasaheb Dhumal

Delhi Political News : देशात 2014 आणि 2019 मध्ये भाजपने स्वबळावर सत्ता स्थापन केली होती. यावेळी मात्र भाजपला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षांची मदत घ्यावी लागली. या मदतीच्या बदल्यात या दोन्ही मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राज्यांना विशेष दर्जा देण्याची मागणी लावून धरली आहे. मात्र बदललेल्या नियमांमुळे त्यांची मागणी पूर्ण करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

देशातील सर्वात गरीब राज्य म्हणून बिहारची ओळख आहे. तर तेलंगणा बाहेर पडल्यानंतर आंध्र प्रदेश राज्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांना विशेष दर्जा देण्याची मागणी जुनीच आहे. मात्र त्याकडे आतापर्यंत दुर्लक्ष केले जात होते. सध्या केंद्रातील स्थिती बदलली असून योगायोगाने संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्‍यांच्याच मदतीने सरकार स्थापन करावे लागले आहे. त्यामुळे नितीशकुमार बिहारला तर चंद्राबाबू नायडू आंध्र प्रदेशाला विशेष दर्जा मिळवून घेण्यासाठी सर्व प्रयत्न करतील, अशी चर्चा आहे.

बिहार अन् आंध्र प्रदेशाला का हवाय विशेष दर्जा

बिहार

सन 2000 मध्ये नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असलेले झारखंड वेगळे झाल्यानंतर बिहारच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. बिहारची आर्थिक स्थिती इतर राज्यांच्या तुलनेत हालाखीची आहे. दरवर्षी पूर आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे राज्याला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. यात मानवी संसाधनांचेही प्रचंड नुकसान होते. येथील कृषी उत्पादकताही कमी आहे. त्यामुळे आर्थिक विकास होण्यासाठी मुख्यमंत्री नितीशकुमार बिहारला विशेष दर्जा देण्याची अनेक वर्षांपासून मागणी करत आहेत.

आंध्र प्रदेश

2014 मध्ये आंध्र प्रदेशातून तेलंगणा राज्य वेगळे झाले. त्यानंतर आंध्र प्रदेशला नव्या राजधानी बांधण्याची गरज निर्माण झाली. राज्याला चक्रीवादळ, पुरासारख्या आपत्तींचाही सामना करावा लागत आहे. आता औद्योगिकीकरण आणि आर्थिक विकासासाठी आर्थिक मदतीची गरज आहे.

दरम्यान, आंध्र प्रदेशला आपले आर्थिक केंद्र तेलंगणाची राजधानी हैदराबादला देण्याच्या बदल्यात पाच वर्षांसाठी का होईना विशेष दर्जा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यानेच 2018 मध्ये चंद्राबाबू नायडूंनी एनडीएची साथ सोडली होती. आता ते पुन्हा एनडीएचा भाग बनले असून मुख्यमंत्री आहेत.

आपल्या राज्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आता बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू प्रयत्नात असणार आहे. केंद्रात आपल्या मदतीने स्थिर सराकर दिल्याचा फायदा घेऊन आपापल्या राज्यांना विशेष दर्जा मिळवून घेण्याचा प्रयत्न हे दोन्ही मुख्यमंत्री करतील. त्यामुळे या सरकारमध्ये तरी बिहार आणि आंध्र प्रदेश या राज्यांना विशेष दर्जा मिळणार का, याकडे लक्ष आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT