Kim Jong Un
Kim Jong Un  
देश

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम यांचे थेट बलाढ्य अमेरिकेलाच आव्हान

सरकारनामा ब्युरो

न्यूयॉर्क : उत्तर कोरियाचे (North Korea) हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) यांनी आता जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेलाच थेट आव्हान दिले आहे. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियातील अस्थिरतेचे मूळ कारण अमेरिकाच आहे, असा हल्लाबोल किम यांनी केला आहे. अण्वस्त्रे आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमांमुळे उत्तर कोरियावर अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय निर्बंध घातले आहेत.

संरक्षण प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी बोलताना किम यांनी अमेरिकेवर हल्लाबोल केला. दोन्ही कोरियांदरम्यान, असलेल्या तणावाला अमेरिका जबाबदार असल्याचा दावा त्यांनी केला. उत्तर कोरियाने 2017 मध्ये एका क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती. यामुळे संपूर्ण अमेरिका खंड उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात आला होता. अमेरिकेने हल्ला केल्यास तो रोखण्यासाठी अण्वस्त्र चाचणीही उत्तर कोरियाने केली आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आधीपासून उत्तर कोरियावर हल्ला करण्याची कोणतीही योजना नसल्याचे जाहीर केले आहे. परंतु, स्वसंरक्षणाच्या नावाखाली किम हे सातत्याने संरक्षणसज्जता वाढवत आहेत. याचाच भाग म्हणून स्वसंरक्षण 2021 या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यात किम यांनी उत्तर कोरियाची संरक्षण सिद्धता दाखवून दिली आणि अमेरिकेलाही थेट इशारा दिला.

अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी किम यांनी 2018 मध्ये भेट घेतली होती. अमेरिकेच्या अध्यक्षांची भेट घेणारे ते उत्तर कोरियाचे पहिले प्रमुख ठरले होते. ही भेट सिंगापूरमध्ये झाली होती. परंतु, त्यानंतर दोन्ही देशांदरम्यानची चर्चा पुढे सरकली नव्हती. यावर्षी हनोई येथे झालेली चर्चा उत्तर कोरियावर टाकलेल्या निर्बंधांमुळे फिसकटली होती.

दरम्यान, किम यांनी काही दिवसांपूर्वी दोन्ही कोरियांदरम्यान हॉटलाईन सुरू करण्याचे जाहीर केले होते. दोन्ही देशांतील वाद चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याचे सूतोवाच करीत त्यांनी शांतीचे गोडवे गायले होते. त्याचवेळी किम जोंग यांनी जगाला मोठा धक्काही दिला होता. उत्तर कोरियाने त्याच आठवड्यात हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याचा दावा केला होता. हॉसाँग-8 असे या क्षेपणास्त्राचे नाव आहे. उत्तर कोरियाने लष्करी विकासाची पंचवार्षिक योजना बनवली आहे. यात पाच अतिशय महत्वाच्या शस्त्रास्त्र यंत्रणा विकसित केल्या जाणार आहेत. यातीलच एक असलेल्या हॉसाँग-8 ची आता यशस्वी चाचणी घेण्यात आली होती.

काही दिवसांपूर्वी किम यांनी देशाला संबोधित करताना अमेरिकेवरही हल्ला चढवला होता. अमेरिकेनेच दोन कोरियांमधील शत्रुत्व वाढवले, असा आरोप त्यांनी केला होता. अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील चर्चा फेब्रुवारी 2019 पासून सुरू आहे. त्याआधी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी येथे किम यांची भेट घेतली होती. उत्तर कोरिया सर्व अण्वस्त्रे नष्ट करेल, असे आश्वासन दिल्यानंतर ही भेट झाली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT