Karnataka
Karnataka Sarkarnama
देश

वाद पेटला! लाल टिळा लावलेल्या विद्यार्थ्याला महाविद्यालयात प्रवेश नाकारला

सरकारनामा ब्युरो

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) आता हिजाबवरून (Hijab) वाद पेटला आहे. यामुळे राज्य सरकारवर शाळा (Schools) आणि महाविद्यालये (Colleges) काही दिवस बंद ठेवण्याची वेळ आली होती. हा वाद आता उच्च न्यायालयात गेला असला तरी त्याचे पडसाद अजूनही उमटत आहेत. लाल टिळा लावून आलेल्या विद्यार्थ्याला महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात आल्याने नवीन गदारोळ सुरू झाला आहे.

राज्यातील हिजाब वादावर उच्च न्यायालयाने अंतरीम आदेश दिला आहे. यात हिजाब आणि भगवे उपरणे हे दोन्ही घालून शाळा व महाविद्यालयांमध्ये येण्यास मनाई करण्यात आली आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आता इंडी येथील एका महाविद्यालयात एक विद्यार्थी लाल टिळा लावून आला होता. त्याला प्रवेशद्वारावरच अडवण्यात आले. शिक्षकांनी या विद्यार्थ्याला कपाळावरील टिळा पुसून टाकण्यास सांगितले. त्यानंतर त्याला महाविद्यालयात प्रवेश देण्यात येईल, असे सांगण्यात आले. त्याने असा टिळा लावल्यास हिजाब आणि भगव्या उपरण्याचा वाद पुन्हा सुरू होईल, असेही शिक्षकांनी नमूद केले. यावरून विद्यार्थी आणि शिक्षकांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला.

अनेक महाविद्यालयांमध्ये बुरखा घातलेल्या विद्यार्थिनी आणि भगव्या रंगाचे उपरणे घेतलेले विद्यार्थी समोरासमोर येऊन वाद होत होते. अनेक महाविद्यालयांमध्ये घोषणाबाजी आणि दगडफेकीचे प्रकार घडले आहेत. यामुळे महाविद्यालयांच्या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. त्याठिकाणी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. हे प्रकरण आता उच्च न्यायालयात गेले आहे. बुरखा वादावर सहा विद्यार्थिनींनी याचिका दाखल केली आहे. वर्गात बुरखा घालण्याचा अधिकार देण्यात यावा, अशी विनंती विद्यार्थिनींनी याचिकेद्वारे केली आहे.

बुरखा बंदीच्या निर्णयावरून राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, राज्य सरकारचीही डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी राज्यातील शाळा व महाविद्यालये तीन दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली होती. बोम्मई यांनी सोमवारपासून शाळा व महाविद्यालये सुरू करण्याची घोषणा केली होती. राज्यातील काही शाळा व महाविद्यालयांमध्ये मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब (Hijab) घालून येण्यास बंदी घालण्यात आली आहे. अशी बंदी घालणाऱ्या शाळा व महाविद्यालयांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT