MNS Raj Thackeray Latest Marathi News, Raj Thackerays Ayodhya Visit News Sarkarnama
देश

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यामुळं भाजपच्या अडचणी वाढणार?

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला वाढता विरोध

सरकारनामा ब्युरो

मुंबई : भाजपचे अयोध्येतील खासदार ब्रिजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध केला आहे. याचवेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ‘रामाच्या चरणी जो जात असेल त्याला जाऊ द्यावे, विरोध करण्याचे काहीच कारण नाही’ असा सल्ला दिला होता. त्यानंतर आता भाजपच्या सहकारी पक्षानेही या दौऱ्याला विरोध केला आहे. यावरून भाजपची कोंडी होण्याची शक्यता आहे. (Raj Thackeray Ayodhya visit Latest Marathi News)

भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या संयुक्त जनता दलाने (JDU) राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध केला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा जेडीयू हा भाजपचा सहकारी पक्ष आहे. याबाबत जेडीयूचे नेते के.सी.त्यागी म्हणाले की, राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांच्या बाबतीत जी भूमिका घेतली होती, त्याला आमचा विरोध आहे. महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षात उत्तर भारतीय विद्यार्थ्यांना बसण्यास मनसेनं विरोध केला होता. त्यावेळी काही विद्यार्थ्यांना मारहाण झाली होती. त्यावेळी मुख्यमंत्री नितीशकुमार यांना हस्तक्षेप करावा लागला होता. टॅक्सी, रिक्षावाल्यांनाही मनसेनं मारहाण केली होती. छोट्या व्यापाऱ्यांनाही मनसेचा विरोध होता. आम्ही त्यांच्या दौऱ्याच्या विरोधात नाही. पण आता राज ठाकरेंनी या सगळ्याबद्दल माफी मागायला हवी. त्यावेळची भूमिका चुकीची होती, याची कबुली त्यांनी द्यावी. असं न घडल्यास ते अयोध्येचा दौरा करण्याची हिंमत कशी करतात ते आम्ही पाहू. राज ठाकरे हे उत्तर भारतीयांचे क्रमांक एकचे शत्रू आहेत.

दरम्यान, मुंबई भाजपचे प्रवक्ते संजय ठाकूर यांनीच राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला आहे. याबाबत ठाकूर यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेत त्यांना निवेदन दिलं होत. यात त्यांनी म्हटलं होतं की, उत्तर भारतीयांना मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली होती, त्याविषयी राज ठाकरे यांनी खेद व्यक्त करावा. भविष्यात भाजपसोबत युती करण्याआधी हे व्हायला पाहिजे आणि त्यासाठी भाजपच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी राज ठाकरेंवर दबाव आणावा. (BJP Latest Marathi News Update)

राज ठाकरेंनी फेरीवाले, टॅक्सीवाले तसेच मजूर या सर्व कष्टकरी वर्गांची माफी मागावी. अन्यथा त्यांच्या अयोध्या दौऱ्याला आमचा कडाडून विरोध असेल. मी घटनात्मक पद्धतीने विचार मांडत आहे. दृष्कृत्याला दृष्कृत्य करून विरोध करण्याची आवश्यकता नाही. मात्र, आम्ही राज ठाकरेंवर निश्चित दबाव आणू शकतो. त्यांनी त्यांची भूमिका मांडण्यासाठी स्वच्छ चारित्र्य घेऊन देशासमोर जावे. त्यामुळे तुमचे हे पाऊल केवळ राजकारणासाठी नसल्याचे स्पष्ट होईल, असंही ठाकूर यांनी म्हटलं होतं. ठाकूर यांच्या या भूमिकेमुळे भाजपचीही अडचण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT